गणेश घाटाकडील रस्ता मोकळा करा
By admin | Published: September 14, 2015 11:50 PM2015-09-14T23:50:58+5:302015-09-14T23:52:16+5:30
आरोंदा जेटी प्रश्न : वैभव नाईकांची मागणी
ओरोस : आरोंदा किरणपाणी जेटीवरील गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा पारंपरिक मार्ग मे. व्हाईट आॅर्चिड इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीने अचानकपणे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक टाकून पूर्णत: बंद केलेला आहे. गणेश विसर्जन मार्गात अडथळा निर्माण झाल्याने आरोंदा परिसरातील गणेशभक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, आरोंदा बाजारपेठ व इतर वाडीतील सर्व ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या गणेश विसर्जन हे किरणपाणी नदीमध्ये ब्रिटीश कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या जेटीवर करीत आहेत. यावर्षी मात्र तेथील जेटीचे विकासक मे. व्हाईट आॅर्चिड इस्टेट प्रा. लि. या कंपनीने ४ व १६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन पारंपरिक घाटावर करण्यास कोणताही प्रतिबंध नसल्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी स्वरूपात पत्र दिले होते. मात्र असे असतानाही या कंपनीने अचानकपणे विसर्जन मार्गावर मोठ्या सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक टाकून मार्ग पूर्णत: बंद केला आहे. गणेश विसर्जन घाटाकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे आरोंदा परिसरातील गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासद विनायक राऊत यांनी स्वत: आरोंदा येथे भेट देऊन मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते आरोंदावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)