Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण, पावसाच्या उघडीपीने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:13 PM2020-08-24T17:13:02+5:302020-08-24T17:18:58+5:30
सिंधुदुर्गसह कोकणात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला.
कणकवली :गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान-थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाचे काहीसे सावट यावर्षीच्या गणेशोत्सवावर आहे.
सिंधुदुर्गसह कोकणात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्यापासून अधिक काळ सुरू होती. भाद्रपद महिना सुरू झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला.
गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी गुरुवारी तर काही जणांनी शुक्रवारी श्री गणेशमूर्ती घरी आणून ठेवल्या होत्या. तर काही ठिकाणी शनिवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान-थोर मंडळींची लगबग सुरू होती.
ढोल-ताशांचा गजर जरी मोठ्या प्रमाणात ऐकू येत नसला तरी फटाक्यांची आतषबाजी अनेक ठिकाणी सुरू होती. श्री गणेश मूर्तीची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच अन्य धार्मिक विधी करण्याचा परिपाठ सुरू झाला आहे. तो श्री गणेशमूर्ती विसर्जनापर्यंत सुरू राहणार आहे.
प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या रूढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे. यावर्षी कोरोनामुळे गणरायांना कमी दिवस आपल्या घरी ठेवण्याचे नियोजन काहींनी केले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. प्रशासनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे.
मृदुंग, तबल्याच्या साथीने आरतीचे सूर
घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर घरात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पाहणाऱ्या लहान-थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला.
टाळ, ढोलकी, मृदुंग, तबला, हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरोहितांच्या अनुपस्थितीत अनेक ठिकाणी पूजा करण्यात आली. त्यासाठी विविध पूजा अॅपची मदत घेण्यात आली.