कणकवलीत पुन्हा अतिक्रमण हटाव
By admin | Published: June 7, 2015 12:44 AM2015-06-07T00:44:11+5:302015-06-07T00:45:53+5:30
मुख्याधिकाऱ्यांचे नेतृत्व : संदेश पारकरांनी विक्रेत्यांची बाजू मांडली
कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने शनिवारी पुन्हा महामार्गाच्या दुतर्फा असलेले तसेच पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे विक्रेत्यांची बाजू मांडली. मात्र, अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण तसेच पदपथावर काही विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने हटविण्यात येत आहे. बुधवारी या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. काही विक्रेत्यांकडून दंडही वसूल करण्यात आला. शनिवारी सायंकाळी पुन्हा अतिक्रमण हटविण्यासाठी शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरपंचायतीचे कर्मचारी आले होते. यावेळी काही विक्रेत्यांनी या मोहिमेबाबत संदेश पारकर यांना माहिती दिल्याने ते आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झाले. तसेच विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांची बाजू मुख्याधिकाऱ्यांकडे त्यांनी मांडली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या विक्रेत्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने माणुसकीच्या भावनेतून तोपर्यंत विक्रेत्यांना महामार्गाच्या दुतर्फा व्यवसाय करु द्यावा. अशी मागणी पारकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिक्रमणाबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण हटवित असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण अतिक्रमण हटावबाबत चर्चा करा, असेही मुख्याधिकाऱ्यांनी पारकर यांना सांगितले. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, बाळा बांदेकर यांच्यासह भाजी विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)