स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करा

By admin | Published: June 21, 2016 09:36 PM2016-06-21T21:36:41+5:302016-06-22T00:06:19+5:30

खारेपाटण बसस्थानक परिसर : काँग्रेसचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

Remove the injustice against the stalker | स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करा

स्टॉलधारकांवरील अन्याय दूर करा

Next

कणकवली : खारेपाटण बसस्थानक परिसरात गेली २५ वर्षांहून अधिक काळ सुमारे २२ स्टॉलधारक व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्यांना जागा खाली करण्याबाबत एस.टी.च्यावतीने नोटीस देण्यात आली आहे. हा त्यांच्यावर अन्याय असून याबाबत तातडीने तोडगा काढावा,अशी मागणी काँग्रेसच्यावतीने कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.खारेपाटण बसस्थानकातील स्टॉलधारकांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी एस. टी. आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष रफीक नाईक, विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, कलमठचे सरपंच निसार शेख उपस्थित होते. तसेच स्टॉलधारक बबलू पाटील, विठ्ठल गुरव, गजानन राऊत, रमाकांत राऊत, संतोष गांधी, अकबर ठाकूर, रवींद्र ब्रह्मदंडे, प्रकाश
नानिवडेकर, आयुब काझी, उदयराज बाबरदेसाई, सुभाष बाबरदेसाई, शेखर शिंदे, परशुराम शिंदे, इकबाल ठाकूर, बाळा रोडी आदी उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापकांचे विविध विषयांकडे लक्ष वेधण्यात आले. हे स्टॉलधारक गेली अनेक वर्षे ग्रामपंचायत हद्दीतील जागेत असल्याने रितसर कर भरत आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेले नाही. असे असतानाही एस. टी.च्यावतीने ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टॉलधारकांना नोटीस बजावली गेली आहे. या स्टॉलधारकांचा उदरनिर्वाह या स्टॉलवरच होत आहे. त्यामुळे हे स्टॉल बंद झाल्यास त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे एस.टी.प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या स्टॉलधारकाना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. त्याच बरोबर स्टॉलधारकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.(वार्ताहर)


आगार व्यवस्थापकांचे आश्वासन
आपले म्हणणे वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल. तसेच तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले.

Web Title: Remove the injustice against the stalker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.