राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना पदावरून हटविले; पक्षाचा तडकाफडकी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:50 PM2019-07-29T12:50:11+5:302019-07-29T12:52:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना अचानक पदावरून दूर केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. गवस समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले असून, राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना अचानक पदावरून दूर केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. गवस समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले असून, राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरेश गवस यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.
सुरेश गवस यांची एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या नेमणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट कमालीचा नाराज होता. हा गट पक्षापासून दूर गेला होता. यात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक आदींचा समावेश होता. गवस जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्व बैठकांवर बहिष्कार घातला होता. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कोणत्याच बैठकांना ते येत नव्हते.
त्यातच अलीकडे वेंगुर्ले येथील तालुकाध्यक्ष पदावरून झालेला वाद असो किंवा बुथ कमिटीच्या बैठकांवरून झालेला वाद असो या सर्व बैठकांचा अहवाल पक्षनिरीक्षकांनी वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सुरेश गवस यांना बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पत्र शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गवस यांना पाठविले असून, त्यांची नियुक्ती प्रदेश सरचिटणीस पदावर करण्यात आली आहे.
मी पक्षाच्या पडत्या काळात काम केले असून, माझ्यावर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या सर्व समर्थकांनी शनिवारी सावंतवाडी येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आम्ही पक्षाचे राजीनामे देणार असून, पक्षात काम करण्यास आम्ही इच्छुक नसल्याचे कळविणार असल्याचेही गवस यांनी सांगितले आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी प्रवीण भोसले इच्छुक
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कार्याध्यक्ष म्हणून अबीद नाईक इच्छुक असल्याचे सांगितले जात असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या दोन नावांचा पक्ष विचार करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. दोन नावांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचीही पसंंती असल्याचे सांगण्यात येत आहे.