महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 24, 2022 01:13 PM2022-09-24T13:13:14+5:302022-09-24T13:14:00+5:30

आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या

Repairs in Mahapareshan Kharepatan sub station are complete, power supply in Sindhudurg district is smooth | महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

महापारेषणच्या खारेपाटण उपकेंद्रातील दुरूस्ती पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

Next

सिंधुदुर्ग : महापारेषणच्या २२०/१३२ केव्ही खारेपाटण अतिउच्चदाब उपकेंद्रातील दुरुस्ती कार्य सलग १५ तासाच्या अथक परिश्रमानंतर पुर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, मालवण, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील बाधित वीजपुरवठा अखेर पुर्ववत झाला. याकरिता कोल्हापूर, चिपळूण व रत्नागिरी येथून दाखल महापारेषणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसह महावितरण यंत्रणेने रात्रीचा दिवस केला. प्रसंगावधान राखून लोकप्रतिनिधी, नागरिक व वीजग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य दिले.

 दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३५ वाजता खारेपाटण अतिउच्च दाब उपकेंद्राच्या आयसीटीत (इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर) तांत्रिक बिघाड होऊन ऑईलने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळाल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुंभारमाठ, पेंडूर ,आचरा, तळेबाजार, जामसंडे देवगड, वाडा, खारेपाटण व वैभववाडी या महावितरणच्या ३३/११ के व्ही उपकेंद्रावरील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला. जवळपास १ लक्ष २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला.

कणकवली व राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहाय्याने दीड - दोन तासाच्या कसरतीनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांनतर चाचपणी करून दुरूस्ती कार्य हाती घेण्यात आले. रात्रभर जागून, राबून काम पुर्ण केले. अखेर दि २३ सप्टेंबर  रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी खारेपाटण उपकेंद्राचा वीजपुरवठा यशस्वीपणे पुर्ववत करण्यात आला.

महावितरणचा महापारेषणच्या सहाय्याने वीजपुरवठ्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याचा खटाटोप सुरू होता. सिंधुदुर्ग व ओरोस जिल्हा केंद्राचा वीजपुरवठा अडीच ते तीन तासात तातडीची पर्यायी व्यवस्था करून पुर्ववत करण्यात आला होता. त्यासाठी कणकवली अतिउच्च दाब उपकेंद्रातील  १६ एमव्हीए क्षमतेच्या एका पॉवर ट्रान्सफॉर्मरला ११० केव्ही राधानगरी अतिउच्च दाब उपकेंद्रावरून वीज पुरवठा जोडण्यात आला होता.

महापारेषणचे संचालक (संचालन) अनिल कोलप हे सातत्याने क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. महावितरणचे मुख्य अभियंता विजय भटकर, अधिक्षक अभियंता विनोद पाटील, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार, अधिक्षक अभियंता प्रांजल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, कार्यकारी अभियंता विनोद विपर, कार्यकारी अभियंता अभिजित ढमाले, कार्यकारी अभियंता विजय निकम आदींनी कामकाज पाहिले.

Web Title: Repairs in Mahapareshan Kharepatan sub station are complete, power supply in Sindhudurg district is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.