फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार
By admin | Published: April 5, 2016 12:56 AM2016-04-05T00:56:54+5:302016-04-05T00:56:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मंडल अधिकारीही आॅनलाईन
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकारी कार्यालये आॅनलाईन होत असून नागरीकांच्या फेरफार नोंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तीन तालुक्यांना शासनाकडून मंजूरी मिळाली असून प्रथम हे तीन तालुके आॅनलाईन होत असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी दालनात झाला. यावेळी माहिती देताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.
महसूल यंत्रणेतील मंडल अधिकारी कार्यालये आता आॅनलाईन होणार आहेत. सर्व तालुक्यांच्या ‘सिडीज’ तयार करण्याचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे शासन निर्देश होते. त्यानुसार सर्व तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले आहे. या सर्व सिडीज शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील वैभववाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला हे तीन तालुके प्राधान्यक्रमाने घेण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आता नागरिकांच्या या दस्तऐवजाच्या नोंंदी आता आॅनलाईन मंजूर होणार आहेत. नोंदी प्रलंबित राहणार नाहीत. आपल्या जिल्ह्यात १८ लाख सात-बारा धारक आहेत. आता तहसीलदार आणि भूमिअभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंगही सुरू असून हे कामही ४० टक्के पर्यंत पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ६९ पदांच्या भरती प्रक्रियेची यादी प्रसिध्द होऊन त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. याबाबत तक्रारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याचा अहवाल नुकताच शासनाकडे पाठविण्यात आला असून शासनाकडून आदेश प्राप्त होताच रखडलेली सर्व नियुक्ती पत्रे उमेदवारांना देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीपोटी प्राप्त ३७ कोटी निधीपैकी ३५ कोटी ४३ लाखांचे वाटप झाले आहे. त्याची आकडेवारी ९६ टक्के आहे. अखर्चित राहिलेले १ कोटी ५७ लाख रूपये शासनास पाठविण्यात आले असून हा निधी यावर्षी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी भंडारी यांनी सांगितले.
लोकसंख्या नोंद करण्याचा कार्यक्रम ९५ टक्के पूर्ण झाला आहे. त्यामध्ये आधारकार्डच्या नोंदी असल्याने त्याही पूर्ण झाल्या आहेत. ते कामही १०० टक्के पूर्ण होईल तसेच वैभववाडी तालुक्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या यु. एन. डी. पी. प्रकल्पांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा व्याघ्रेश्वर येथे देशातील दुसरा क्रॅब हॅचरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. देशात केवळ तामिळनाडूमध्ये असा प्रकल्प आहे. यासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च आहे. केंद्र शासनाचे विशेष सचिव सुशिलकुमार यांनी नुकतीच २०१२ पासून सुरू असलेल्या यु. एन. डी. पी. प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गात क्रॅब हॅचरी (खेकडे पालन) प्रकल्प सुरू करणार असल्याचे सागितले. छोटी मासळी जाळ्यातून निसटण्यासाठी गोलाकार जाळे विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही मासळी जाळ्यात अडकण्यापासून वाचते. त्यामुळे दुष्काळाचा संभवणारा धोका टळू शकतो. हा चांगला उपक्रम असल्याने जिल्हा नियोजन मधून १९ लाख रूपये देण्यात आले. अशा प्रकारे ३१७ मच्छिमारांना या जाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)