‘टाटा’च्या जागी नवीन प्रकल्प आणावा

By admin | Published: March 30, 2016 10:41 PM2016-03-30T22:41:12+5:302016-03-30T23:52:31+5:30

कर्मचाऱ्यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन : रेडी येथील टाटा मेटालिक्सने प्रकल्प केला बंद

Replace 'Tata' with new projects | ‘टाटा’च्या जागी नवीन प्रकल्प आणावा

‘टाटा’च्या जागी नवीन प्रकल्प आणावा

Next

कुडाळ : टाटा मेटालिक्स रेडी या बंद औद्योगिक प्रकल्पाच्या जागेत नवीन प्रकल्प आणण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना येथे टाटा मेटालिक्स रेडी कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, माजी अर्थमंत्री व रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने जानेवारी १९९० मध्ये जिल्ह्यातील रेडी गावात उषा इस्पात नावाने पिग आयर्न प्रकल्प आणला गेला. हा सिंधुदुर्गातला पहिलाच मोठा प्रकल्प असल्याने, या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळेल, आपल्या भागाचा विकास होईल या विचारांनी प्रेरित होऊन रेडी गावातील जमीनमालकांनी अल्प मोबदल्यात जमिनी कंपनीला प्रकल्पासाठी दिल्या. हा प्रकल्प सुरु झाल्यावर सुमारे स्थानिक १५०० जणांना कायमस्वरूपी तर सुमारे ५०० जणांना कंत्राटी स्वरूपाचे काम मिळाले. त्याचबरोबर मालवाहतूकदार, व्यापारी यांचाही फायदा झाला. साधारण १४ वर्षे अनेक समस्यांना तोंड देत हा प्रकल्प सुरु होता. मात्र, कर्जाची परतफेड वेळेवर होऊ न शकल्याने, कंपनीच्या गलथान व्यवस्थापनामुळे प्रकल्प अखेर बंद पडला.
या बंद प्रकल्पाचा २००५ मध्ये लिलाव केला. लिलावात हा प्रकल्प खडगपूर येथील नामांकित कंपनी मे. टाटा मेटालिक्स लि. ने खरेदी केला. मात्र, काही कामगारांनाच पुन्हा नव्याने कमी पगारावर कामावर ठेवले. उषा कंपनीकडून काहीच नुकसानभरपाई न मिळाल्याने व सर्वांनाच काम न मिळाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तरीही नवीन कंपनीच्या नावावर विश्वास ठेवून कामगारांनी तसेच स्थानिक नेत्यांनीही फारसा विरोध केला नाही.
२००५ ते २०११ या कालावधीत टाटा कंपनीने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला. या कंपनीला प्रामुख्याने कर्नाटक राज्याच्या खाणींमधून कच्च्या मालाचा पुरवठा होत होता. या खाणींवर घातलेल्या बंदीमुळे कच्च्या मालाचा होणारा तुटवडा, स्वत:च्या मालकीच्या खाणी सुरु करण्यासाठी न मिळालेली राज्य शासनाची परवानगी, तत्कालीन राज्य सरकारची उदासीनता आदी बाबींमुळे प्रकल्पाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी झाले. अखेर मार्च २०१३ मध्ये कामगारांना नाममात्र नुकसानभरपाई देऊन प्रकल्प बंद केला. पुन्हा एकदा सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली.
सुदैवाने मोठ्या उद्योगांना लागणारी पुरेशी जमीन, मुबलक पाणी, वीज व कुशल कामगार वर्ग अनायसे रेडी येथे उपलब्ध आहे. रेडी येथे येण्यासाठी उद्योगपतींना उद्युक्त करण्याचे काम करावे, अशी मागणी या निवेदनातून सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन टाटा मेटलिक्स रेडीचे कर्मचारी प्रसाद सौदागर, अनंत कांबळी, वीरेंद्र परब, गुणेश पाटकर, गफार खानापुरे यांनी दिले. (प्रतिनिधी)

कामगारवर्ग नैराश्याने ग्रस्त
टाटा कंपनी रेडीतील हा प्रकल्प पुन्हा सुरु करेल ही शक्यताच जवळपास संपुष्टात आली आहे. अनेक कामगार विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत. नैराश्याने ग्रासलेला हा कामगार वर्ग महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.

Web Title: Replace 'Tata' with new projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.