देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:43 PM2020-02-17T17:43:07+5:302020-02-17T17:44:38+5:30
देवगड आगाराची सुरू असलेली देवगड-नांदगांव रेल्वेस्टेशन ही फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला.
देवगड : देवगड आगाराची सुरू असलेली देवगड-नांदगांव रेल्वेस्टेशन ही फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला.
देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये देवगड आगारातून दुपारी सुटणारी देवगड-नांदगांव ही फेरी नांदगांव रेल्वे स्टेशनवर दिवा पॅसेंजर रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना न घेता रिकामी देवगडला येते. त्यामुळे तेथील प्रवाशांना नांदगांव तिठ्यापर्यंत येण्यासाठी ४० ते ५० रूपये खासगी वाहनाला नाहक मोजावे लागत असून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.
आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रा सुरू होत असून कोकणात यात्रांसाठी बरेच भाविक प्रवासी येणार आहेत. त्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांना घेऊनच एसटी रेल्वेस्थानकावरून सोडावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी या फेरीचे सकाळपासून सुरू असलेल्या शेड्युलचे नियोजन करून नांदगांव रेल्वेस्टेशन ही बस प्रवाशांना घेऊनच सोडण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष महेश नलावडे, सचिव जगदीश जाधव, विभाग अध्यक्ष अभिजीत तेली, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र करंगुटकर, वैभव परब, चेतन नलावडे आदी उपस्थित होते.