तक्रार द्या, न्याय मिळेल
By Admin | Published: December 23, 2014 10:15 PM2014-12-23T22:15:11+5:302014-12-23T23:44:26+5:30
आज राष्ट्रीय ग्राहक दिन : फसवणुकीबाबत आवाज उठविण्याचे आवाहन--लोकमत विशेष
रजनीकांत कदम - कुडाळ --आपली आर्थिक व्यवहारात फसवणूक झाली आहे काय? झाली असेल, तर निश्चितपणे आपण यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार करा. आपल्याला ९० दिवसांच्या आत जलदगतीने न्याय मिळेल. नुकसान भरपाईही मिळवून दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांनो, जागे व्हा आणि अन्याय, फसवणुकीविरोधात तक्रार द्या, असे आवाहन ग्राहक मंचातर्फे प्रबंधक आनंद सावंत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केले.
ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शासनाने ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ अंमलात आणला, तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ग्राहक दिन साजरा करताना आपल्या जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कांसंदर्भात किती जागरू क आहेत, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
लहान-मोठ्या खरेदी-विक्रीमधून आपली विविध पद्धतीने फसवणूक होत असते. आपण पैसे मोजून सेवा घेतो. मात्र, ती सेवा आपल्याला योग्य पध्दतीने मिळत नाही. आपली फसवणूक होते. तरीही आपण याकडे कानाडोळा करतो. या लहान-सहान फसवणुकीतून आपण आपले हक्क आणि कायदे मात्र विसरून जात आहोत. ग्राहकांच्या बाजूने शासनाने अनेक कायदे करून ठेवले आहेत. परंतु आपण मात्र अशा कायद्यांची ओळख करून घेत नाही. आता मात्र असे करून चालणार नाही. झालेली फसवणूक व अन्यायाविरोधात पेटून उठले पाहिजे. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, हे विसरून चालणार नाही. ग्राहकांना तक्रार द्यायची असल्यास जिल्हा ग्राहक संरक्षण मंच, ओरोस येथेच यावे लागते. यासाठी लागणाऱ्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे काही ग्राहक तक्रार देण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात तक्रार देण्यासंदर्भात कार्यालय असणे आवश्यक आहे.
येथील मंचाचे कार्यालय ई-फायलिंग झालेले नाही. लवकरच हे कार्यालय ई-फायलिंग होणे गरजेचे आहे. जेणेकरून ई-सेवेच्या वापरातून ग्राहकांना आपल्या तक्रारी नोंदविणे सोयीस्कर होईल. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या कार्यालयाच्या इमारतीचेही काम हे निधी अभावी अपूर्णावस्थेत आहे. यामुळे हे कार्यालय सिंधुुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. त्यामुळे ग्राहक मंचची स्वतंत्र इमारत केव्हा पूर्ण होणार, हा प्रश्न पडत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून आता वर्षे वाढत गेल्यामुळे निधीमध्येही वाढ होत गेली असून आता हा आकडा ३० लाखाच्या घरात पोहोचल्याचे समजते.
अधिकतर प्रकरणे बांधकाम जमिनी संदर्भात
ग्राहक मंचाकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे बांधकाम जमीन, घरबांधणी यासंदर्भातील आहेत.यावर्षी बांधकाम जमिनीसंदर्भात २१ प्रकरणे, विमा ६, वीज वितरण २, घरगुती साधनांसंदर्भात ६, बँक, पतपेढ्यांसदर्भात ७ आणि इतर ८ प्रकरणे दाखल झाली. ग्राहक मंचाचे कार्य आणि ग्राहकांना यापासून मिळणाऱ्या फायद्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत जनजागृती करणे आवश्यक आहे, मात्र ती होताना दिसत नाही.
सर्र्वानी चौकस रहावे : सावंत
ग्राहक कोणीही असो, कुठच्याही आर्थिक व्यवहारात मोबदला देऊनही फसवणूक होत असेल, सेवा अपुरी पडत असेल, तर ग्राहकांनी चौकस रहावे व ग्राहक मंचाकडे लेखी तक्रार द्यावी. त्यांना योग्य तो न्याय निश्चितच मिळेल. असा विश्वास जिल्हा तक्रार निवारण मंचचे प्रबंधक आनंद सावंत यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतींमध्ये होणारी फसवणूक ग्लोबल मार्केटींगमुळे आता काही प्रमाणात कमी झाली आहे. तरीही ग्राहकांनी जागृत राहून ग्राहक कायदा आत्मसात करावा व अन्यायाविरोधात ग्राहक मंचकडे दाद मागावी.
- धनाजी तोरस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी
जनजागृती हवी
ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी असलेल्या कायद्यांबाबत प्रशासनाकडून योग्य प्रकारे जनजागृती आवश्यक आहे.
जनजागृती होत नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये या योजनेबाबत अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत योग्य पावले उचलणे आवश्यक आहे.
पथनाट्ये, भित्तीपत्रके, विविध शालेय स्पर्धा, वृत्तपत्रे आदी माध्यमांच्या आधारे ग्राहक मंचची कार्यप्रणाली व फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचविता येऊ शकतात.