सिंधुदुर्गमधील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण, दिल्लीला रवाना होणार
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 24, 2024 02:17 PM2024-01-24T14:17:37+5:302024-01-24T14:20:50+5:30
सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील नाभिक ...
सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर साजरा होणाऱ्या भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून जिल्ह्यातील नाभिक समाजातील सात दाम्पत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा सर्वसामान्य नाभिक व्यावसायिकांचा सन्मान असल्याच्या भावना नाभिक समाजातील कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. या निमंत्रणामुळे त्यांचे सहकारी, नाभिक व्यावसायिक व समाजातही आनंदाचे वातावरण आहे.
केंद्र शासनाने देशभरातून एकूण नाभिक समाजातील सात बांधवांची त्यांच्या जोडीदारासह निवड केली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात नाभिक व्यावसायिक आणि समाज बांधव आहेत. काही कुटुंबे वर्षानुवर्षे हा केशकर्तनाचा व्यवसाय करत आहेत. प्रजासत्ताक दिनी नाभिक समाजातील व्यावसायिक दाम्पत्यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करून सरकारने नाभिक व्यवसायाचा सन्मान केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
यात जगदीश वालावलकर, विजय शिवा चव्हाण, विजयलक्ष्मी विजय चव्हाण, परेश प्रभाकर चव्हाण, पूर्वा परेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, रुपेश पिंगुळकर, रुपाली पिंगुळकर, आकाश पिंगुळकर, सिद्धेश पिंगुळकर आदी दिल्लीला रवाना होणार आहेत. नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.