जिल्हा बँकेसाठी प्रतिष्ठेची लढाई

By admin | Published: March 10, 2015 10:50 PM2015-03-10T22:50:38+5:302015-03-11T00:13:07+5:30

वर्चस्वाबाबत उत्सुकता : आघाडी विरूद्ध युतीमध्ये रंगणार सामना

Reputation battle for the District Bank | जिल्हा बँकेसाठी प्रतिष्ठेची लढाई

जिल्हा बँकेसाठी प्रतिष्ठेची लढाई

Next

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची होणारी निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना प्रतिष्ठेची जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर केले असतानाच आता भाजप व शिवसेना या निवडणुकीत युती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून जिल्हा सहकारी बँक काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असली तरी बँकेवर कोण वर्चस्व प्राप्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हे चित्र मे नंतरच स्पष्ट होणार आहे.दर पाच वर्षांनी जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होते. जिल्हा बँक संचालकांची मुदत यापूर्वीच संपली होती. मात्र, सहकार कायद्यातील दुरूस्तीमुळे विद्यमान संचालकांना दोन वर्षे वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे या १९ संचालकांना तब्बल ७ वर्षे संचालकपदी रहावे लागले आहे. त्याचीही मुदत आता संपली असून आता शासनाने जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. ५ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँकेवर विजय मिळविला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपले बहुतांशी संचालक निवडून आणत ती संख्या १२ पर्यंत नेली होती आणि राष्ट्रवादीकडील जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेतली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेले धक्कादायक निकाल पाहता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल असा अंदाज बांधणेसुद्धा मुश्किल होऊन बसले आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असणारी जिल्हा बँक या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकत काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप युतीकडून होणार आहे.
जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक माजी आमदार राजन तेली यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सहकार क्षेत्राची आवड असल्यामुळे तेली हे या निवडणुकीत आपल्या अनुभवाचा वापर करण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसनेही जिल्हा बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच याबाबतची रणधुमाळी सुरू होणार आहे. प्रत्येकजण या रणधुमाळीत सर्व ताकदीनीशी उतरणार आहे.


जिल्हा बँकेवर झेंडा कुणाचा?
जिल्हा बँकेवर आपलीच सत्ता रहावी यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीसोबतही निवडणूक एकत्रित लढण्याचे जाहीर केले आहे.
काँग्रेस आता जिल्हा बँकेवर ताबा कायम ठेवण्यासाठी कोणती रणनिती वापरते याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली, शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत.
जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या बँकेवर आपले असलेले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नारायण राणे वेगळी रणनिती आखण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने सध्या गावागावात सुरू असलेल्या छोट्या मोठ्या सोसायट्यांच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवत आघाडी घेतली आहे. या निवडणुका जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत कुठल्याही प्रकारे जिंकून आपले प्राबल्य कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेस नेतृत्वासमोर उभे ठाकले आहे. त्यातून काँग्रेस वर्चस्व कायम ठेवते की विरोधक यशस्वी ठरतात याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना भाजप एकत्र येणार
विद्यमान संचालक मंडळाची वाढवून दिलेली मुदतही आता संपत आल्याने मे पर्यंत निवडणूक लागणार आहे. त्यापूर्वीच म्हणजे जानेवारीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विद्यमान संचालक व्हीक्टर डान्टस यांनी आपण ही निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे जाहीर केले होते.
पहिल्यांदाच अशाप्रकारे एकत्र निवडणूक लढविणार असल्याने भाजप व सेनासुद्धा युती करण्याच्या बेतात असून तशी जोरदार चर्चाही सुरू आहे.


सात वर्षात सात अध्यक्ष
सहकार क्षेत्रात गती यावी व संचालकांना काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या ७ वर्षात काँग्रेस श्रेष्ठींनी ७ अध्यक्षांना काम करण्याची संधी दिली होती. त्यामध्ये सुरूवातीलाच डी. बी. ढोलम, अविनाश माणगावकर, गजानन गावडे, सतीश सावंत, कृष्णनाथ तांडेल, राजन तेली त्यानंतर आता प्रभारी डी. बी. वारंग यांना संधी देण्यात आली होती.



जिल्हा बँकेच्या १९ संचालक पदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून २५ मार्च रोजी अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. असे असले तरी मे च्या साधारण १0 ते १५ तारीखला जिल्हा बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Reputation battle for the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.