विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, सिंधुदुर्गातील सरंबळ येथील घटना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 13, 2023 12:42 PM2023-07-13T12:42:39+5:302023-07-13T12:43:04+5:30
वनविभागाने राबविले यशस्वी रेस्क्यू
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. वन विभागाच्या रेस्क्यू टीमने या बिबट्यास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले.
बिबट्या विहिरीत पडलेल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळात रेस्क्यू टीम सहित वनपाल अमित कटके, वनपाल अनिल राठोड, वनपाल सावळा कांबळे, वनपाल महेश पाटील, डीसीए रेड्डी, लाड घटनास्थळी दाखल झाले.
या टीमने विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्याद्वारे सुखरूप बाहेर काढले. बिबट्या पहाटेच्या सुमारास विहिरीत पडला होता. सकाळी नंदकुमार परब हे विहिरीकडे गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. बिबट्या रेस्क्यू मोहिमेत सरंबळ सरपंच रावजी कदम, सागर परब, पोलिस पाटील दिलीप वराडकर आणि सरंबळ गामस्थ यांचे सहकार्य लाभले.