विद्यार्थ्यांची त्रासातून सुटका
By Admin | Published: January 14, 2015 10:03 PM2015-01-14T22:03:08+5:302015-01-14T23:52:04+5:30
मानव विकास बससेवा : दोन दिवस केलेल्या आंदोलनाला यश
वैभववाडी : मानव विकासच्या बसेस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडण्यासह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी दोन दिवस केलेले आंदोलन यशस्वी झाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एस. टी. प्रशासनाचे डोळे उघडल्याने बुधवारी अ. रा. विद्यालयाच्या प्रांगणातून मानव विकासच्या बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची बसमध्ये चढताना अन्य प्रवाशांकडून होणाऱ्या त्रासातून सुटका झाली आहे.मानव विकासच्या एस. टी. बस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडण्याच्या मागणीसाठी येथील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी एस. टी. बस रोखली होती तर विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बसमध्ये प्रवेश देऊ नये असे परिपत्रक एस. टी. प्रशासनाने कॉलेज व वाहतूक नियंत्रकांना दिले होते. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले होते. दोन्ही आंदोलनावेळी संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे आणि पोलिसांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना शांत करीत तोडगा काढला होता.
मानव विकासच्या बसेस कॉलेजच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर विभागनिहाय रांगा करून आधी विद्यार्थिनींनी व नंतर विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढण्याच्या सूचना कॉलेज व्यवस्थापनाने दिल्या. तसेच दररोज या बसेस कॉलेजच्या प्रांगणातूनच सुटतील. त्यामुळे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेज सुटल्यावर प्रवेशद्वाराबाहेर जावू नये अशा सूचना संस्था अधीक्षक रावराणे यांनी दिल्या. कॉलेजच्या प्रांगणातूनच बसेस सुटणार असल्याने अन्य प्रवाशांकडून बसमध्ये चढताना होणाऱ्या त्रासातून विद्यार्थिनींची सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)
आदेश मिळाले
विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता एस. टी. प्रशासनाने तत्काळ न केल्यास पुन्हा रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी कॉलेज सुटून विद्यार्थिनी आणि विद्यार्थी बस स्थानकावर पोचले तरी मानव विकासच्या बसेस कोठून सोडायच्या याबाबत वाहतूक नियंत्रकांना वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले नव्हते. अखेर ११.४५ वाजताच्या सुमारास कॉलेजच्या प्रांगणात चला बस तेथून सुटतील असे बसस्थानकातून सांगण्यात आले. त्यामुळे बसस्थानकातून विद्यार्थी, विद्यार्थिनी पुन्हा कॉलेजमध्ये परतल्या.