कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर
By admin | Published: December 6, 2015 10:26 PM2015-12-06T22:26:08+5:302015-12-07T00:19:54+5:30
९ महिला, ८ पुरुष मिळून १७ सदस्य : दोन महसुली गावांचे सर्वेक्षण आज
कुडाळ : कुडाळ शहर नगरपंचायतीची अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर झाली असून, भविष्यातील नगरपंचायतीमध्येसुद्धा १७ सदस्य असणार आहेत. यामध्ये ९ महिला व ८ पुरुष असे उमेदवार असल्याचे या आरक्षण अधिसूचनेवरून निश्चित झाले आहे. तसेच या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसुली गावांचे अनुसूचित जाती जमातीचे सर्वेक्षण आज, सोमवारी तत्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच सर्वेक्षण अहवालानंतरच नगरपंचायतीची प्रभाग रचना जाहीर होणार आहे .कुडाळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यासंदर्भात १० आॅगस्ट २०१५ रोजी जाहीर झाल्यानंतर या नगरपंचायतीकडे नगरपंचायतीची वॉर्ड रचना कशी असेल, आरक्षण कुठे पडणार याकडे राजकीय नेते, कुडाळवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून, प्रशासनाने या नगरपंचायतीची आरक्षण अधिसूचना जाहीर केली आहे. आरक्षण अधिसूचना जाहीर झाल्यामुळे (पान १०
येथील राजकीय वर्तुळात आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरक्षणाची अंतिम मंजुरी प्रशासनाने दिली आहे. कुडाळ नगरपंचायत आरक्षण माहिती कुडाळ ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात येणार आहे. या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसुली गावांचे अनुसूचित जाती जमातीचे सर्वेक्षणही २०११ च्या लोकसंख्या जनगणनेनुसार होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार कुडाळची लोकसंख्या १६ हजार १५ एवढी आहे. वॉर्डरचना करत असताना अनुसूचित जाती, जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग यांचीही लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
आरक्षण
कुडाळ नगरपंचायतीची एकूण नगरसेवक संख्या ही १७ असून, यामध्ये महिला (९) पुरुष (८) असे नगरसेवक असल्याचे निश्चित झाले आहे. आरक्षणाचा विचार करता अनुसूचित जाती (१) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) (५) पैकी ३ महिला व २ पुरुष, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण उमेदवार ११, पैकी ६ महिला व ५ पुरुष असे आरक्षण असणार आहे.
सर्वेक्षण अहवाल सोमवारीच होणार तयार
कुडाळ शहरातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल पूर्ण झालेला आहे. मात्र या नगरपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसूली गावांच्या अनुसूचित आलेल्या जाती जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल पूर्ण झालेला नाही.
त्यामुळे नगरपंचायतीचे आरक्षण अधिसूचना जाहीर झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कविलकाटे व सांगीर्डेवाडी या दोन महसूली गावांचे अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येचा अहवाल तत्काळ मागितला असल्याने सोमवार ७ डिसेंबर रोजी हे सर्वेक्षण नगरपंचायतीचे कर्मचारी करणार आहेत.
प्रादेशिक संचालक,नगरपालिका प्रशासन तथा कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार कुडाळ नगरपंचायतीच्या जातनिहाय आरक्षणाबाबत अंतिम आरक्षण जाहीर केले असून तशी माहीती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कुडाळ नगरपंचायत प्रशासक सुरेश काशिद यांना शनिवारी कळविण्यात
आली होती.