कुडाळ स्टेशनमास्तर धारेवर आरक्षण तिकिटाचा काळाबाजार
By admin | Published: May 28, 2014 01:13 AM2014-05-28T01:13:31+5:302014-05-28T01:34:51+5:30
राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
कुडाळ : कुडाळ रेल्वेस्थानकावर होणार्या आरक्षण तिकिटांच्या काळ्या बाजाराबाबत संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालून धारेवर धरले. हा प्रकार न थांबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकणात आलेल्या प्रवाशांना आता परतीचे वेध लागले आहेत. प्रवास सुखकर होण्यासाठी तत्काळ कोट्यातून आरक्षण मिळविण्यासाठी कुडाळ रेल्वेस्थानकावर पहाटेपासून प्रवाशांची रांग लागत आहे. परंतु स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याने भल्या पहाटे येऊनही प्रवाशांना आरक्षण तिकिटे मिळत नाहीत. काळा बाजार करणारे दलाल रात्रीपासूनच रांगेत जागा अडवून असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संतप्त प्रवाशांनी कणकवलीहून येथे आलेल्या रेल्वे पोलिसाला याबाबत जाब विचारला होता. महत्त्वाचे म्हणजे तिकिटांच्या काळ्या बाजाराची कल्पना असूनही रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी रेल्वे पोलीस उपलब्ध नसल्यामुळे सामान्यांची परवड होत होती. रेल्वे प्रशासनाच्या या उदासिन धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी कुडाळ राष्टÑवादीचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, प्रफुल्ल सुद्रिक, संजय भोगटे, भास्कर परब, जीवन बांदेकर, संग्राम सावंत, सूर्यकांत नाईक, छोटू पारकर, सदानंद सावंत यांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. तिकिटांचा काळा बाजार थांबवा, कायमस्वरूपी रेल्वे पोलिसाची नियुक्ती करा, तसेच तिकीट घराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसावावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी स्टेशनमास्तर यांनी, रेल्वे तिकीट घराच्याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमण्यात येईल, तिकिटांचा काळा बाजार बंद होण्यासाठी उपाययोजना करू, असे आश्वासन दिले. यावेळी रेल्वेस्थानकावर पोलीस आणि रेल्वे पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. (प्रतिनिधी)