आरक्षण राबवणाऱ्या राज्यांचा विकास झाला
By admin | Published: June 30, 2015 09:51 PM2015-06-30T21:51:15+5:302015-06-30T21:51:15+5:30
रावसाहेब मोहन : कणकवलीत कार्यक्रम
कणकवली : सामाजिक क्रांतीमध्ये आरक्षणाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण भारतामध्ये दिसत असून ज्या ज्या राज्यांनी आरक्षण नीती प्रभावीपणे राबविली त्या राज्यांचा विकास झाल्याचे दिसून येत असल्याचे मत लोकशाही राष्ट्रवादी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक अॅड. रावसाहेब मोहन यांनी व्यक्त केले.
येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात रविवारी ‘आम्ही भारतीय’ परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आरक्षण हे फक्त अस्पृश्यांकरीता आहे, असा चुकीचा समज आहे. मानवी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाला आरक्षण देऊन राष्ट्रनिर्मिती करण्याचे काम संविधान सभेने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डी. एस. नाईक म्हणाले, शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थांनामध्ये राबविलेल्या आरक्षण नीतीचा प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर होता. त्यामुळे संविधान निर्मितीवेळी राष्ट्रनिर्मितीसाठी तो एक नियम न ठेवता अपवाद ठेवण्यासाठी आरक्षण नीतीवर बारा कलमे देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत ६० वर्षांनंतर आरक्षणाची तरतूद बंद होईल, अशी सूचना संविधानकर्त्यांनी केली असताना त्याच आरक्षण कलमांवर ५० वर्षांनंतर कायम ठेवण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली. याचाच अर्थ आरक्षणाची प्रामाणिक अंमलबजावणी झाली नाही.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम होते. माजी निवृत्त उपजिल्हाधिकारी सुरेश कदम यावेळी उपस्थित होते.