पर्ससीनधारक करणार ‘करो या मरो’ आंदोलन
By admin | Published: February 11, 2016 10:26 PM2016-02-11T22:26:09+5:302016-02-11T23:57:52+5:30
पंधरा दिवसात निर्णय घ्या...: पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका
रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी केला असून, अधिसूचनेबाबत १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास करो या मरो भूमिका घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मिरकरवाडा येथे मच्छिमारांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी मच्छिमार नेते सुलेमान मुल्ला, जहुर दर्वे, माजी नगरसेवक शरीफ दर्वे, नगरसेवक नुरुद्दीन पटेल, शब्बीर राजपूरकर, शौकत दर्वे, सिराज वाडकर, नजीर सरदार, बाबामियॉ मजगावकर, मकसूद हुना, असगर बांगी, रियाज मस्तान, सलाऊद्दिन हातवडकर, शहादत हबीब, सिकंदर हाजू आदी मिरकरवाडा, साखरीनाटे व अन्य गावातील पर्ससीन नेटधारक मच्छिमार उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने एकतर्फी अधिसूचना काढली असून, पर्ससीन नेटधारक मच्छिमारांना दुर्लक्षित केले. त्यामुळे एक कुटुंबाला जगविण्यासाठी दुसऱ्या कुटुंबाचा बळी घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी उपस्थित केला.
जिल्ह्यात १० टक्क्यांपेक्षा कमी पारंपरिक मच्छिमार आहेत. त्यामध्ये रापणकार हे मालवण आणि रत्नागिरीतील मिऱ्या भागात आहेत. त्यामुळे ९० टक्के पर्ससीन नेटधारक मच्छिमारांवर शासनाकडून अन्याय करण्यात आल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
पर्ससीन नेटधारक मच्छिमारांसाठी मासेमारीचा कालावधी डिसेंबरपर्यंत करण्यात आला आहे, ही अट शिथिल करावी. तसेच त्यांना मे महिन्यापर्यंत मुभा द्यावी, अशी मागणी यावेळी मच्छिमारांनी केली. पावसाळ्यानंतर दोन महिने खोल समुद्रातील मासेमारीसाठी वातावरण खराब असते. त्यामुळे पुढील दोन महिन्यात मासेमारी काय करणार व बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार, असा प्रश्न उपस्थित करुन एप्रिल व मे महिन्यामध्ये मासेमारी बंद केली, तर मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली. त्यामुळे ही अट शिथिल केली नाही, तर मच्छिमारांना आत्महत्या करावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत विचार करावा, अन्यथा करो या मरो, भूमिका घेऊन आंदोलन उभारून मोर्चा काढणार असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
सोमवंशी समितीच्या अहवालावरून एका बाजूने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला तो चुकीचा असून, त्यासाठी आणखी एक समिती नेमून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निर्णय घ्यावा, अशी मागणीही पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. (शहर वार्ताहर)