ओसरगाव टोल नाक्यावरील टोलवसुलीविरोधात सिंधुदुर्गवासीय आक्रमक, व्यवस्थापकाला आणले फरफटत
By सुधीर राणे | Published: June 14, 2023 04:21 PM2023-06-14T16:21:38+5:302023-06-14T16:22:04+5:30
कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कोरल असोसिएट, राजस्थान या ठेकेदार कंपनीकडून बुधवारी सकाळी ८ ...
कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कोरल असोसिएट, राजस्थान या ठेकेदार कंपनीकडून बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुली सुरू करण्यात आली होती. सिंधुदुर्गवासीयांचा विरोध झुगारून ही टोल वसुली पोलिस बंदोबस्तात सुरु होती. मात्र, टोल वसुली करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेनुसार सकाळी ८ वाजता सुरु केलेली टोल वसुली सकाळी ९.५५ वाजता थांबवण्यात आली. दरम्यान, टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक राहुल डांगे यांना संतप्त झालेल्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी फरफटत माध्यमांसमोर आणले.
टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीसह सर्वपक्षीय मंडळींनी त्या ठिकाणी येऊन सिंधुदुर्गवासीयांकडून टोल वसुली करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर टोल वसुली कंपनीच्या व्यवस्थापकाने स्थानिक प्रश्न प्रलंबित असल्याने लोकांचा विरोध लक्षात घेता टोल वसुली तूर्तास करू शकत नाही असे पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले. तसेच ते पत्र टोल मुक्त कृती समितीलाही दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, या तात्पुरत्या टोल वसुली स्थगितीवर आम्ही समाधानी नसून, टोल वसुली सुरू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा कृती समितीने दिला.
बुधवारी सकाळी टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये व अन्य पदाधिकारी , शिवसेना आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, भाजपाचे मनोज रावराणे, मिलींद मेस्त्री, राष्ट्रवादीचे अमित सामंत, कॉंग्रेसचे इर्शाद शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते टोल नाक्यावर दाखल झाले. सर्व राजकीय पक्षांच्यावतीने टोल वसुलीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. अचानक पुन्हा टोल वसुली चालु केल्यास कोरल असोसिएटच्या कर्मचा-यांना टोल प्लाझा वर बसू देणार नसल्याचा इशारा सर्वपक्षीयांनी दिला.
भाजप-कृती समितीचा स्वतंत्र फलक
यावेळी स्थानिकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे या मुद्यावर सर्वाचे एकमत दिसून आले. मात्र भारतीय जनता पार्टीकडून घोषणाबाजी करत स्वतंत्र फलक टोल नाक्यावर लावण्यात आला. तर दुसरा फलक टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समितीने लावला होता. त्याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.
व्यवस्थापकाला आणले फरफटत!
टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक राहुल डांगे यांनी कृती समितीला राष्ट्रीय प्राधिकरणला दिलेल्या पत्राची प्रत देवून आपण टोल वसुली करत नसल्याचे आश्वासन दिले . मात्र डांगे हे प्रसिद्धीमाध्यमांसमोर ते पत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फरफटत माध्यमांसमोर आणले. त्यानंतर काहीवेळाने टोल वसुली बंद झाल्याने सर्व पक्षीयांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. ओसरगाव येथे टोलवसुलीच्या मुद्दयावर निर्माण झालेला तणाव दुपारी १२ वाजता निवळला. त्यानंतर हळूहळू प्रशासनाने पोलिस बंदोबस्त कमी केला.
आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग!
या आंदोलनात कृती समिती, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाकडून कणकवली नायब तहसिलदार शिवाजी राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कडक पोलिस बंदोबस्त!
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, किशोर सावंत,पोलिस निरीक्षक अनिल जाधव, उपनिरीक्षक वृषाली बरगे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.