‘नाणार’ रद्द केल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:30 AM2019-03-05T06:30:50+5:302019-03-05T06:31:04+5:30
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सोमवारी केली.
कणकवली : कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सोमवारी केली.
राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला. यात कोकणचे पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झाले. तीन लाख कोटींचा प्रकल्प आणि यातून लाखो रोजगार संधी निर्माण होणार होती. मात्र, प्रकल्पच रद्द झाल्याने आम्ही निराश झालो आहोत. कोकणवासीयांना रोजगार निर्माण करून देण्याची आम्ही घोषणा केली होती. पण प्रकल्प रद्द
झाल्याने ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जठार यांनी सांगितले. जठार म्हणाले, पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. मात्र कोणतीही माहिती न घेता उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला ही चुकीची घटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती. आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.