जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींचे राजीनामे
By Admin | Published: January 3, 2016 12:35 AM2016-01-03T00:35:55+5:302016-01-03T00:35:55+5:30
उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्याकडे कारभार
ओरोस : ‘सर्वांना समान संधी’ या काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व विषय समिती सभापतींचे राजीनामे शनिवारी घेण्यात आले, तर काँग्रेसची सत्ता असलेल्या देवगड, वैभववाडी व मालवण या तीन पंचायत समित्यांचे सभापती, कणकवलीचे उपसभापती या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले. सव्वा वर्षाचा कार्यभार पूर्ण झाल्याने काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या आदेशानुसार हे राजीनामे घेण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व राजीनामे दिलेल्या विषय समिती सभापतिपदांचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांचा राजीनामा आयुक्तांकडे, तर जिल्हा परिषद विषय समिती सभापती संजय बोंबडी, गुरुनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले, तर देवगड, वैभववाडी व मालवण सभापतींनी आपले राजीनामे अध्यक्षांकडे व कणकवली उपसभापतींनी कणकवली सभापतींकडे राजीनामे सादर केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये २१ सप्टेंबर २०१४ रोजी संदेश सावंत यांनी अध्यक्षपद स्वीकारले, तर गुरुनाथ पेडणेकर यांची शिक्षण व आरोग्य सभापती, संजय बोंबडी यांची बांधकाम सभापती व वित्त सभापती तसेच स्नेहलता चोरगे यांची महिला व बालविकास सभापती म्हणून कारकीर्द सुरू झाली होती. या सर्वांच्या पदांची सव्वा वर्षाची कारकीर्द शुक्रवारी संपली.
पंचायत समिती सभापतींचेही राजीनामे
काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्ह्यात पाच पंचायत समित्या असून, कुडाळ पंचायत समिती ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडीमध्ये आहे. तसेच या पंचायत समितीमध्ये सभापतिपदी काँग्रेसच्या प्रतिभा घावनळकर या आहेत. ही जागा ओबीसी महिला राखीव असून, या पदासाठी दुसरा उमेदवार नसल्याने कुडाळ सभापती कायम राहणार आहेत, तर कणकवली पंचायत समिती सभापतिपद राखीव असल्याने तिथेही दुसरा पर्याय नसल्याने कणकवली सभापतिपदी विराजमान असलेल्या आस्था सर्पे कायम राहणार आहेत, तर उपसभापती म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब वर्देकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.
तसेच देवगड, वैभववाडी आणि मालवण या पंचायत समित्यांच्या सभापतींचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यात देवगड सभापती मनोज सारंग, वैभववाडी सभापती वैशाली रावराणे आणि मालवण सभापती सीमा परुळेकर या सर्वांचे राजीनामे आले असून, याठिकाणी सभापतींचा कार्यभार उपसभापतींकडे राहणार आहे, अशी माहितीही सतीश सावंत यांनी दिली. (वार्ताहर)
‘नो आॅप्शन’
दरम्यान, राष्ट्रवादीमधून काँग्रेस पक्षात आलेले जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती अंकुश जाधव हे काँग्रेसकडे समाजकल्याण सभापतिपदी रुजू झाले. त्यांना सतत पाच वर्षे जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कारण या पदासाठी काँग्रेसकडे अन्य उमेदवारच नाही.
राणे देतील ती जबाबदारी पार पाडू
अध्यक्षपदाच्या सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर आपण समाधानी असून, यापुढे नारायण राणे आपल्यावर जी जबाबदारी देतील, ती समर्थपणे पार पाडणार आहे. आपणास सर्वच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी सहकार्य केले. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास व यापुढे देणारी जबाबदारी आपण तेवढ्याच समर्थपणे हाताळू.
- संदेश सावंत
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष