अबकारी कराला विरोध करा
By admin | Published: May 19, 2016 11:28 PM2016-05-19T23:28:56+5:302016-05-19T23:58:58+5:30
नीतेश राणेंचे सुवर्णकारांना आवाहन : विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हयातील सुवर्ण व्यावसायिकांनी एकत्र येऊन अबकारी कराचा विरोध करावा. आपण त्याला राजकारणविरहीत पाठींबा देऊ. प्रसंगी अबकारी कर या प्रश्नासाठी सुवर्ण व्यावसायिकांचे प्रतिनिधीत्व करून विधानभवनावर मोर्चा काढू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी देवगडमधील सुवर्ण व्यावसायिकांच्या संघटनेला दिले. केंद्रसरकार कायदा करून बसली आहे. त्याला संघटीतपणे विरोध करा अन्यथा हा कायदा कायमचा डोक्यावर बसेल यातून मोठे नुकसान होईल असा सल्लाही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.
देवगड सुवर्णकार सराफ संघटनेने देवगड शासकीय विश्रामगृह येथे आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी देवगड सुवर्णकार सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, उपाध्यक्ष महेश घारे, सचिव नीलरत्न मालंडकर, संदिप तळवडेकर, किरण वेसणेकर, संदीप कुळकर्णी, घनश्याम कुळकर्णी, गिरीश कुळकर्णी, समीर कुळकर्णी, यतिन कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, महेश मोंडकर, विवेक मोंडकर, संजय बेलवलकर, वैभव घारे आदी उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या सन २०१६-१७ अर्थसंकल्पामध्ये सोन्यावर १ टक्के अबकारी कर लावण्यात आला आहे. त्या विरोधात देशातील सर्व सुवर्णकार-सराफांनी देशव्यापी बंद पुकारून आंदोलने केली आहेत. मुळात अबकारी कर आकारल्यामुळे इन्स्पेक्टर राज निर्माण होऊन सुवर्णकार व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. सुवर्णकारांचा, सराफांचा कर आकारणीला विरोध नाही परंतु सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्यापेक्षा आयात केल्या जाणाऱ्या ९०५ हून अधिक टन सोन्यावर अबकारी कर आकारावा म्हणजे सरकारला यातून महसूल मिळेल. एक्साईज अधिकाऱ्यांचा जाच यापूर्वी ३० वर्षे सुवर्णकारांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे सुवर्णकार या अबकारी कराला विरोध करत आहेत.
प्रा. मधु दंडवते अर्थमंत्री असताना सुवर्णकारांना एक्साईजचा असलेला जाच त्यांनी पूर्णपणे अभ्यासानंतर तत्कालीन सरकारने अबकारी कर रद्द करून सुवर्ण नियंत्रण कायदा रद्द केला होता. त्यामुळे हा व्यवसाय कित्येक पट वाढल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. सरकारलासुध्दा करोडो रूपयांचा महसूल मिळाला आहे. याचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे. ४२ दिवसांचा संप करूनसुध्दा सुवर्णकार सराफ संघटनांच्या मागणीकडे मोदी सरकाने संवेदनशील नजरेने पाहिले नाही.
जेव्हा २०१२ साली तत्कालीन काँग्रेस सरकारनेसुध्दा अबकारी कर आकारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुवर्णकार सराफ संघटनांचा विरोध पाहून काँग्रेस सरकारने २१ व्या दिवशी अबकारी कर रद्द करून सुवर्णकार सराफांना दिलासा दिला होता, तसा दिलासा यावेळीही मिळावा अशी विनंती केली आहे. (प्रतिनिधी)
देवगड येथे आमदार नितेश राणे यांना देवगड तालुक्यातील सुवर्णकारांनी निवेदन दिले.