महामार्ग रुंदीकरणाला विरोध

By admin | Published: June 22, 2017 01:05 AM2017-06-22T01:05:50+5:302017-06-22T01:05:50+5:30

कुडाळ येथील आमसभेत झारापच्या ग्रामस्थांचा इशारा

Resistance to the highway widening | महामार्ग रुंदीकरणाला विरोध

महामार्ग रुंदीकरणाला विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : आमसभेत जनतेच्या आलेल्या प्रश्नांबाबत महिनाभरात आढावा बैठक आयोजित करून हे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कुडाळ तालुक्याच्या आमसभेत बोलताना आमदार वैभव नाईक यांनी दिली. या सभेत महामार्गावर पडलेले खड्डे मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बुजविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपाचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण काही काळ तंग होते. मात्र, ही आमसभा खेळीमेळीत पार पडली.
महामार्गाचे खड्डे रात्रीच्यावेळी बुजविले जात आहेत. मंत्र्यांसाठी खड्डे बुजवू नका. त्यांना खड्ड्यांतूनच येऊ द्या. गेल्यावर्षी कोणत्या एजन्सीने खड्डे भरले त्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केली. यावेळी भाजपाचे राजू राऊळ बोलत असताना वादंग झाला. जुने काय झाले ते नको, आताचे काय ते बोला, असे सांगत काँगे्रस कार्यकर्ते आक्रमक झाले. यामध्ये हस्तक्षेप करत एजन्सीने नीट काम न केल्यास कारवाई करण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले. तर सतीश सावंत यांनी २४ जूननंतरच खड्डे भरा, असा टोला हाणला.
रूपेश कानडे यांनी प्रश्न मांडतानाच झाराप रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, तसेच चौपदरीकरणामध्ये झाराप बाजारपेठेवर अन्याय होत असेल तर तीव्र विरोध करण्याचा इशारा त्यांनी दिला.
जिल्ह्यातील इतर बँका कर्ज नाकारत आहेत. बँक मॅनेजरांची अशी मानसिकता असेल, तर येथील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायला नको, असे निदर्शनास आणून दिले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी बँकांची संंयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अनेक तक्रारी आहेत. कामे पूर्ण होत नाहीत, अंदाजपत्रके मिळत नाहीत, अशा तक्रारी असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी या विभागातील कामांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. निवजे पोलीस ठाण्यात येणारी कुडाळ तालुक्यातील गावे कुडाळ पोलीस ठाण्याला सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी मांडली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडताना शेवगा, पपई, अननस यांना एमआरईजीएसमधून लागवड निधी मिळावा, सोनवडे-कडावल पंचक्रोशीसाठी आरोग्यकेंद्र, वीज वितरण सेक्शन आॅफिस मिळावे. राष्ट्रीय पेयजलचा आराखडा करण्याची केंद्राची परवानगी जिल्हा परिषदेला नाही, ती मिळावी. शेती कनेक्शन मिळावे, जांभवडे-भटवाडी ते सोनवडे रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून व्हावा, यांत्रिकीकरणासाठी निधी द्यावा, विद्यापीठाने मान्यता दिलेल्या बांबू लागवडीला रोजगार हमीमधून शासनाने मान्यता द्यावी, बांबू रोपाची किं मत ९ रूपये आहे ती १२ रूपये व्हावी, असा ठराव घेतला.
कुडाळचे तहसीलदार अजय घोळवे हे जरा उशिराने आले. त्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी थेट सभेतच नाराजी व्यक्त केली. सभेची पूर्वकल्पना असूनही वेळेत का आला नाहीत? हे योग्य नाही, असे आमदार नाईक यांनी सुनावले.

Web Title: Resistance to the highway widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.