सिलिका मायनिंगला विरोध
By admin | Published: April 2, 2015 10:55 PM2015-04-02T22:55:50+5:302015-04-03T00:45:23+5:30
जनसुनावणी नियमबाह्य : मठ सतये वेंगुर्ले निशाण तलाव बचाव समितीची टीका
वेंगुर्ले : मठ वेंगुर्ले येथील प्रस्तावित सिलिका मायनिंगला ग्रामस्थांचा विरोध असून ८ एप्रिल रोजी होणारी जनसुनावणी नियमबाह्य आहे, अशी टीकाही यावेळी मठ सतये वेंगुर्ले निशाण तलाव बचाव समितीच्या सदस्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.मठ गावासह वेंगुर्ले नगर परिषदेच्या हद्दीतील काही जमिनींमध्ये मायनिंग उत्खननाला परवानगी देणारी सरकारी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध वेंगुर्लेवर खनिजाचे संकट उभे राहिले आहे. वेंगुर्ले मठसह बफर झोनमध्ये येणाऱ्या होडावडे, वेतोरे, आडेली, वजराठ या गावातील लोकांनाही दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार. या सर्व प्रक्रियेत स्थानिकांच्या भावना लक्षात घेण्यात आल्या नाहीत. या मायनिंग उत्खननाला विरोध करण्यासाठी मठ सतये वेंगुर्ले निशाण तलाव बचाव समितीची स्थापना करण्यात आल्याचे बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी समिती अध्यक्ष धोंडू गावडे, कार्याध्यक्ष अतुल हुले, उपाध्यक्ष भूषण नाबर, सचिव प्रदीप जोशी, तुळशीदास ठाकूर, खजिनदार अजित धुरी आदी उपस्थित होते.मठ वेंगुर्ले परिसरात बागायती व शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मायनिंग सुरु झाल्यानंतर होणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने आंबा पिकावर परिणाम होणार असल्याचे भूषण नाबर यांनी सांगितले. मायनिंगप्रवण क्षेत्रात लोकवस्ती, शेती व जंगल नसल्याचा खोटा पर्यावरणविषयक अहवाल देत कंपनीने शासकीय परवानग्या मिळविल्या आहेत. मात्र, परिस्थिती नेमकी उलट आहे. मायनिंग सुरु होणाऱ्या क्षेत्रालगत लोकवस्ती आहे. कंपनीने शेतकऱ्यांना फसविले आहे. त्यामुळे अन्य लोकांनीही कंपनीच्या आमिषांना बळी पडू नये असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. मायनिंगचा आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची दाट शक्यता असल्याचे डॉ. प्रदीप जोशी यांनी सांगितले.हे मायनिंग क्षेत्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशाण तलावानजिक असल्याने शहराची पाणी व्यवस्था धोक्यात येणार आहे. शहराला भविष्यात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही अतुल हुले यांनी स्पष्ट केले.
तसेच ८ एप्रिल रोजी होणारी जनसुनावणी नियमबाह्य असल्याचे अजित धुरी यांनी सांगत ग्रामस्थांच्या हरकतींवर समाधानकारक माहिती दिल्यानंतर जनसुनावणी घेण्याची व आपली मते मांडण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली
आहे. (प्रतिनिधी)
वेंगुर्लेत जास्त
महाराष्ट्रात एकूण मायनिंग लिज ३५५, सिंधुुदुर्गातील मायनिंग प्रकल्प ५५ तर वेंगुर्ले तालुक्यात १0 मायनिंग प्रकल्प आहेत. यात रेडी, डोंगरपाल, तुळस, होडावडा, आरवली, मठ आदी गावांचा समावेश असल्याची माहिती समितीतर्फे यावेळी देण्यात आली.