नारायण राणेंकडे राज्याचे नेतृत्व देण्याचा ठराव
By admin | Published: May 21, 2014 12:53 AM2014-05-21T00:53:44+5:302014-05-21T17:38:02+5:30
काँग्रेस चिंतन बैठक
सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत अपयशावर चिंतन करून आणि झालेल्या चुका सुधारून पुन्हा येत्या दोन महिन्यात काँग्रेस पक्ष बळकट करू, असा निर्धार आजच्या काँग्रेस चिंतन बैठकीत करण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्यादृष्टीने नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारीणीची चिंतन बैठक आज सिंधुदुर्गनगरी येथे झाली. या बैठकीत माजी आमदार राजन तेली, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अशोक सावंत, विकास सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दत्ता सामंत, अॅड. संग्राम देसाई, जयेंद्र परूळेकर, मिलिंद कुलकर्णी, प्रज्ञा परब आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी माहिती देताना जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात पालकमंत्री नारायण राणे यांच्या व नीलेश राणे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. आम्ही कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण आम्ही करणारच आहोत. या निवडणुकीतील अपयश सहजासहजी पचविता येणारे नाही. मोदींच्या लाटेची त्सुनामी आली हे खरे असले तरी काही आमच्या चुका झाल्या हे नाकारता येणार नाही. त्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी आज चिंतन बैठक झाली. नीलेश राणेंच्या पराभवामुळे राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे. राणे कुटुंबियांमुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी आली. त्यांनी या जिल्ह्यासाठी कार्यरत रहावे यासाठी त्यांचा राजीनामा मागे घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार विजय सावंत यांनी पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याच्याविरोधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी सावंत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी यामागची कारणे शोधून पुन्हा जोमाने काम करू. ‘जनता हीच लोकशाहीचे दैवत आहे’ तेव्हा पुन्हा एकदा जनतेला विश्वासात घेऊन संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करू. कार्यकर्त्यांमुळे मतदार दुखावणार नाहीत याची दक्षता घेतानाच प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून यापुढे काँग्रेस संघटना वाढवू आणि येणार्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पुन्हा राणे फॅक्टरच दिसून येईल. कोणत्याही चुकांचे एका दिवसात चिंतन पूर्ण होत नाही. यापुढे ते सुरूच राहील. २२ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले. तर २६ ते २८ मे या दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेऊन जनतेशी चर्चा करणार. चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)