जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा संकल्प करा : विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 10:34 AM2021-03-16T10:34:34+5:302021-03-16T10:36:16+5:30
Shiv Sena Sindhudurg- विकासाच्या नुसत्या बाता मारून विरोधक जनतेला भुलवीत आहेत. मात्र, आपल्याला शिवसेनेचा विचार घराघरात पोचवायचा असून आगामी सर्व निवडणुकांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आता सज्ज व्हा. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले.
कणकवली : विकासाच्या नुसत्या बाता मारून विरोधक जनतेला भुलवीत आहेत. मात्र, आपल्याला शिवसेनेचा विचार घराघरात पोचवायचा असून आगामी सर्व निवडणुकांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आता सज्ज व्हा. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात कोरोना काळात चांगले काम केलेल्या आशा स्वयंसेविकांचा ' कोरोना योद्धा' म्हणून कणकवली शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, नीलम सावंत- पालव, नागेंद्र परब,विकास कुडाळकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, गीतेश कडू, राजू शेट्ये, संदेश सावंत- पटेल, हर्षद गावडे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रीमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, सतीश सावंत यांनी संचालकांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेत भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे. जिल्ह्यात दादागिरी काही ठिकाणी अजून बाकी राहिली आहे. ती नष्ट करायला हवी. शिवसैनिकांनी राज्य सरकारचे काम लोकापर्यंत पोहचवावे. तसेच येथील सर्वांगीण विकास होण्यासाठी कार्यरत व्हावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू मेस्त्री यांनी केले. यावेळी सतिश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले. नीलम सावंत- पालव यांनी प्रास्ताविक केले.
अंगावर आल्यास शिंगावर घेवू !
आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून सकारात्मक निर्णय निश्चितच घेण्यात येईल. देशात सर्वात लोकांशी जास्त संपर्क असलेल्या खासदारांमध्ये विनायक राऊत यांचे नाव येते. चिपी विमानतळाचे श्रेय फक्त त्यांचेच आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक हे सोने आहे ,त्यांचे पक्षप्रमुखांवर खूप प्रेम आहे. त्या प्रेमाचे ताकदीत रुपांतर झाले पाहिजे. मी शांत आहे. पण कोणी अंगावर आल्यास त्याला शिंगावर घेण्याची ताकद माझ्यात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी काळजी करू नये. असे यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.