‘बचपन आफ्टर पचपन’ला प्रतिसाद
By admin | Published: December 14, 2014 08:07 PM2014-12-14T20:07:10+5:302014-12-14T23:53:04+5:30
क्रीडा महोत्सव : कुंब्रलच्या पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग
बांदा : कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत पालक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पालकांनी विविध मैदानी तसेच सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत ‘बचपन आफ्टर पचपन’ अनुभवले.
कुंब्रल गावचे सरपंच विलास सावंत यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष भाऊ वाळके, माजी सरपंच शितल राउळ, बाबा गाड, माजी सभापती प्रमोद कामत, मुख्याध्यापिका मनाली देसाई, सोनाली सातार्डेकर उपस्थित होते. नाबर प्रशालेने पालक क्रीडा दिनाचा आगळावेगळा उपक्रम राबवून पालक व शाळा यांच्यातील नाते घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विलास सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी पालकांनी विविध मैदानी व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये महिला पालकांचाही सहभाग लक्षणीय होता. क्रीडाशिक्षक सागर सावंत, प्रशांत देसाई यांनी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्टरीत्या नियोजन केले. स्वागत व प्रास्ताविक मनाली देसाई यांनी केले. सूत्रसंचालन रिना मोरजकर यांनी केले. प्रशांत देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नाबर प्रशालेने पालक क्रीडा दिनाचा आगळावेगळा उपक्रम राबवून पालक व शाळा यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पालकांना पुन्हा लहानपण अनुभवण्याची संधी मिळाली.