मच्छिमारांच्या कोचीनच्या अधिवेशनास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 01:06 PM2019-12-11T13:06:36+5:302019-12-11T13:07:53+5:30
नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मालवण : नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रॅलीत केरळ येथील पारंपरिक वाद्ये, कोळी वेशभूषा लक्षवेधी ठरली. कोचीन मरीन ड्राईव्ह येथून सुरू झालेल्या या रॅलीचा टाऊन हॉल येथे समारोप झाला. यावेळी मच्छिमार एकजुटीचा विजय असो..., समुद्र आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. निळे झेंडे, निळी टोपी परिधान करून हजारो मच्छिमार रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीत एनएफएफ राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी केंद्रीय मंत्री के. थॉमस, महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी टी. पीटर(केरळ), व्हाईस प्रेसिडेंट ओलांसीओ सिमॉइस (गोवा), डॉ. कुमार वेलू, ज्योती मेहर, कार्यकारिणी सदस्य देबाशिष (पश्चिम बंगाल), उस्मान भाई (गुजरात), रमेश धुरी, रविकिरण तोरसकर, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष लिओ पोलोसो, उपाध्यक्ष किरण कोळी, रामकृष्ण तांडेल, राजन मेहर, फिलिप मस्तान, उज्ज्वला पाटील, पूर्णिमा मेहर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे, नारायण कुबल, धर्माजी आडकर, गोविंद केळुसकर, दाजी जुवाटकर, गुरू जोशी आदींसह अन्य मच्छिमार प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तीन दिवसीय अधिवेशनात मच्छिमारांना भेडसावणाऱ्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय समस्यांवर चर्चा होणार आहे. संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविली जाणार आहे. तसेच नील अर्थव्यवस्था, सागरी मत्स्यपालन धोरण, मत्स्य व्यवसायातील महिलांचा सहभाग आणि समस्या तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, मार्गदर्शन होणार आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. मत्स्य व्यावसायिक महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय समिती स्थापन व्हावी या मागण्यांसाठी जिल्ह्यातील मच्छिमार प्रतिनिधी या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे रविकिरण तोरसकर यांनी स्पष्ट केले.