गृहिणीच्या जबाबदारीबरोबर ‘ती’ करते दुचाकी दुरूस्ती

By Admin | Published: September 30, 2016 11:46 PM2016-09-30T23:46:26+5:302016-10-01T00:18:54+5:30

--सलाम नारीशक्तीला

With the responsibility of the housewife, she 'does' the two-wheeler repair | गृहिणीच्या जबाबदारीबरोबर ‘ती’ करते दुचाकी दुरूस्ती

गृहिणीच्या जबाबदारीबरोबर ‘ती’ करते दुचाकी दुरूस्ती

googlenewsNext

मेहरून नाकाडे--रत्नागिरी --गृहिणीची जबाबदारी सांभाळून गेली पंधरा वर्षे दुचाकी दुरूस्ती करणाऱ्या कल्याणी शशिकांत शिंदे यांनी आपल्या क्षेत्रात कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. पाना, स्कू्रू ड्रायव्हर घेऊन संपूर्ण दुचाकी खोलून त्यातील नेमका बिघाड काय आहे, हे शोधून दुरूस्त करण्यात कल्याणी यांचा हातखंडा आहे. सकाळी १० वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पतीसह स्वत:च्या गॅरेजमध्ये गाड्या दुरूस्तीमध्ये त्या व्यस्त असतात.
कल्याणी यांनी दहावीनंतर आयटीआयमध्ये जाण्याचे ठरविले. इलेक्ट्रीशनला प्रवेश घ्यायचा हे मनोमन निश्चित केले. मैत्रिणींच्या सांगण्यावरून अर्जावर दोन ते तीन ट्रेड भरावयाचे असल्याने मोटार मेकॅनिकलचा ट्रेड नमूद केला. आयटीची प्रवेश यादी जाहीर झाली त्यावेळी कल्याणीचा नंबर लागला होता. परंतु इलेक्ट्रीशनऐवजी मोटार मेकॅनिकलच्या ट्रेडला तिला अ‍ॅडमिशन मिळाले होते. त्यावेळी कल्याणीच्या वर्गात दोन मुली व अन्य सर्व मुलगे होते. सर्वांनाच त्यावेळी कुतूहल होते. या प्रशिक्षण घेऊन पुढे करणार काय. दोन वर्षे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एस. टी.मध्ये अ‍ॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज केला. परंतु महिला म्हणून अर्ज नाकारण्यात आला. इतर वर्गमित्रांना एस. टी.त संधी मिळाली. कल्याणी हिने नाराज न होता काही दुचाकी गॅरेज मालकांकडे कामासाठी विचारणा केली. त्यावेळीही महिला म्हणून तिला नकाराची घंटा ऐकावी लागली. आपण घेतलेल्या शिक्षणाचा काही उपयोग होईल का? यामुळे सतत निराशा येत असे. ३ ते ४ महिने वाया गेले. त्यावेळी आयटीआयच्या शिक्षकांनी शहरातील एका ओळखीच्या गॅरेज मालकाला विचारले. मुलगी आहे, परंतु काम प्रामाणिकपणे करेल, अशी शाश्वती दिल्यावर संबंधित गॅरेज मालकाने तिला कामाची संधी दिली. महिला म्हणून गॅरेजमध्ये गाड्या दुरूस्तीला येतील का? हा प्रश्न तर होताच, शिवाय महिला म्हणून वाईट नजरेने पाहणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. यामुळे मालकाला थोडेसे टेन्शन होते. परंतु कल्याणी यांच्या कामातील प्रगती पाहून गॅरेजमालकाचा तिच्याबद्दल विश्वास वाढला. हळूहळू कल्याणीच्या कामाची माहिती झाली.
वर्षभरानंतर गांधी मोटर्सचे मालक जयप्रकाश गांधी यांनी कल्याणी यांना बोलावून दुचाकी दुरूस्तीचे काम करशील का? अशी विचारणा केली. चार चाकी दुरूस्तीचे प्रशिक्षण घेतल्यामुळे दुचाकी दुरूस्त कशी करणार, हा प्रश्न होताच, शिवाय कधी दुचाकी हातातही घेतली नव्हती. त्यांच्या कामातील प्रगती पाहून पुन्हा त्यांना पुणे येथे ‘प्लेजर’ गाडी दुरूस्तीच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर ‘मेस्ट्रो’ गाडीचे खास प्रशिक्षण नागपूर येथे देण्यात आले.
गांधी मोटर्समध्ये काम करीत असताना कल्याणी यांचे लग्न झाले. त्यांचे पती शशिकांत व मोठे दीर लहू हेदेखील मेकॅनिक असल्यामुळे त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले. दुचाकी दुरूस्तीत त्या निष्णात झाल्या. लग्नानंतर घरची जबाबदारी, मुले सांभाळून गॅरेजची नोकरी करण्यापेक्षा पतीच्या सोबतीने काम करण्याचे ठरविले. घरातील सर्व कामे आटोपून त्या सकाळी १० वाजल्यापासून गॅरेजमध्ये काम करीत असतात.

ग्रीस लागल्यामुळे होणारे काळे हात, पाना, स्कू्र ड्रायव्हर, नटबोल्ट हातात घेण्यापेक्षा घरी जाऊन आईची धुणी भांडी कर, पोळ्या लाट, अशा शब्दात मला पुरूष सहकारी हिणवायचे. परंतु मनामध्ये जराही किंतु परंतु न बाळगता मनापासून दुरूस्तीचे काम करीत असे. मी निवडलेले क्षेत्र चुकीचे नव्हते. कोणतेही काम छोटे मोठे नसते, प्रामाणिकपणे केले तर यश जरूर मिळते. माझी चेष्टा करणारी मंडळीच आज तुझा अभिमान वाटतो, असे सांगतात, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं, असे कल्याणी सांगतात.

Web Title: With the responsibility of the housewife, she 'does' the two-wheeler repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.