आरोग्य संपन्न जिल्ह्यासाठी कटीबद्ध
By admin | Published: December 23, 2015 11:37 PM2015-12-23T23:37:38+5:302015-12-24T00:56:05+5:30
संदेश सावंत : वागदे येथे आरोग्य शिबिरास प्रारंभ, सिंधुदुर्गात २0 शिबिरे होणार
कणकवली : आरोग्य सेवेअभावी सिंधुदुर्गातील एकही रुग्ण रहाता नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी २0 मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ वागदे येथून होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच येथील जनता आरोग्य संपन्न व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी येथे दिली.
कणकवली तालुक्यातील वागदे येथे सिंधु कृषी, औद्योगिक,पशु-पक्षी, मत्स्य व्यवसाय प्रदर्शन व पर्यटन महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, सुरेश ढवळ, वैशाली रावराणे, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, विजय चव्हाण, मुश्ताक गवंडे, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबासाहेब वर्देकर, महेश गुरव, पोलीस निरीक्षक सुनील मोरे, वागदे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी आदी उपस्थित होते.
रणजीत देसाई म्हणाले, सध्या आपली जीवन शैली बदलत आहे. त्यामुळे अनेक आजारांनाही आपोआपच आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांच्या आजाराचे निदान झाल्याशिवाय राहू नये. तसेच त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन आहे. नुसते आरोग्य शिबिर घेऊन न थांबता आवश्यकता भासल्यास रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना तंदुरुस्त बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीच हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या आरोग्य शिबिरात सहभागी होण्याचे आवाहनही केले. शेखर सिंह म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी आरोग्य विभागात नवीन जोश आणि स्फूर्ती आणली आहे. त्यांच्यामुळे आरोग्य विभागाची सर्व टीम जोमाने कामाला लागली आहे.
सामान्य जनतेला दुर्धंर आजारांवर आर्थिक परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य होत नाही. मात्र, या आरोग्य शिबिरांमुळे ते शक्य होईल. फक्त आरोग्य तपासणी शिबिर घेऊन आरोग्य विभागाने न थांबता रुग्णांवर परिपूर्ण उपचार होण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच आरोग्य संपन्न जिल्हा घडवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी गुरुनाथ पेडणेकर, स्नेहलता चोरगे, आस्था सर्पे, डॉ. शरद सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. योगेश साळे यांनी, आभार उपसभापती बाबासाहेब वर्देकर, सूत्रसंचालन शाम सावंत यांनी केले.
आरोग्य शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
विदेशी पर्यटकांकडून पाहणी
जिल्ह्यात सध्या ईयर एंडिंग आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
विदेशी पर्यटकांनी बुधवारपासून सुरू झालेल्या या कृषी महोत्सवाची पाहणी केली.
या कृषी महोत्सवात मोठ्या प्रमाणावर जनावरे घाटमाथ्यावरून दाखल झाली आहेत.
आज उद्घाटन : कृषी, पशु, पक्षी महोत्सव
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वागदे येथे कृषी, पशु पक्षी, पर्यटन महोत्सवाचे गुरुवारी सकाळी १0.३0 वाजता उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
बुधवारी झालेल्या आरोग्य शिबिरात दिवसभरात ७८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सकाळपासूनच अनेक रुग्णांनी शिबिरस्थळी गर्दी केली होती.
आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सांगली तसेच अन्य ठिकाणचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते. यामध्ये डॉ. सूरज पवार, डॉ. शरद सावंत, डॉ. अलोकनाथ शर्मा, डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ. विद्याधर तायशेटये, डॉ. प्रशांत मोघे आदी डॉक्टरांचा समावेश होता.