जमिनीच्या खातेफोडीवर निर्बंध कायम
By admin | Published: November 30, 2015 09:35 PM2015-11-30T21:35:03+5:302015-12-01T00:21:52+5:30
समस्या ‘जैसे थे’ राहणार : उपजिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन; हिर्लोक परिसरातील शेतकऱ्यांत संताप
कडावल : जमिनीच्या खातेफोडीवरील निर्बंध उठविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी हिर्लोक येथील समाधान योजनेच्या कार्यक्रमात केली होती. मात्र, टाळंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे अद्याप पुनर्वसन झाले नसल्याने लाभक्षेत्रातील खातेफोडीवरील निर्बंध उठविता येणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लेखी कळविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांची मालिका ‘जैसे थे’ राहणार आहे.
टाळंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे अद्याप पुनर्वसन झालेले नसल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमधील जमिनींची खरेदी-विक्री, खातेफोड, धडेवाटप आदी कामांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कित्येक वर्षे खातेफोड न झाल्यामुळे आज विभक्त झालेल्या अनेक कुटुंबांमधील सदस्यांची नावे एकाच सातबारावर नोंद झाली आहेत. त्यामुळे शासकीय योजना राबविताना शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत.
शासकीय योजनेमधून विहीर बांधणी, घरकुल बांधणी, फळझाड लागवड तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना राबविताना लाभार्थ्यांना अडचणीचे होते. हिर्लोक येथील समाधान योजनेच्या झालेल्या कार्यक्रमात धडेवाटपाच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबतचे निर्बंध उठविण्याची मागणी केली होती. तहसीलदारांनी हे निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले होते. मात्र, खातेफोडीवरील निर्बंध उठविण्यास उपजिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. याबाबत कार्यालयात कळविण्यात आलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, टाळंबा पाटबंधारे प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील समाविष्ट गावांतील आठ एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना जमीन विक्री तसेच हस्तांतरणास निर्बंध लावण्यात आलेले आहेत. बुडीत क्षेत्रातील विस्थापितांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील निर्बंध उठविता येत नाहीत. त्यामुळे धडेवाटपास मंजुरी देता येत नाही. (वार्ताहर)