बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम

By admin | Published: November 11, 2016 11:26 PM2016-11-11T23:26:51+5:302016-11-11T23:26:51+5:30

बहुतांश एटीएम सेंटर बंदच : नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची बँक, पोस्टाकडे धावाधाव

The result of market turnover | बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम

बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम

Next

 
कणकवली : धाडसी निर्णय घेत केंद्र शासनाने ५00 व १000 च्या जुन्या नोटा बाद केल्यामुळे अनेकांना फटका बसला आहे. शुक्रवारी बँका सुरु असल्याने सामान्य नागरिकांसह व्यापारी तसेच इतर व्यक्तींना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, कणकवली शहरातील एटीएम सेंटर बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
शासनाने ५00 तसेच १000 च्या नोटा चलनातून बाद केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुट्या पैश्यांअभावी अनेक लोकांची गैरसोय होत आहे. व्यापारी तसेच किरकोळ विक्रेते, व्यावसायिक, पेट्रोल पंप चालक अशा सर्वांनीच ग्राहकांकडून ५00 तसेच १000 च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले असून याचा जास्त फटका सामान्य जनतेला बसला आहे. आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.
जुन्या नोटा जमा करणे, नोटा बदलून घेणे, पैसे काढणे अशा व्यवहारासाठी अनेक बँकांमध्ये शुक्रवारी सकाळ पासूनच ग्राहकांनी गर्दी केली होती. कणकवली शहरातील एटीएम सेंटर बंद असल्यानेही बँकेतील गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते. बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकानी रांगा लावल्या होत्या. गुरुवारपेक्षा शुक्रवारी बँकांमधील गर्दीत आणखीन वाढ झाल्याचे दिसून येत होते. लमाणी बांधव तसेच हमालीचे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी दाखल झाल्याचे चित्र होते. सर्व प्रकारच्या बाजारांमध्ये गुरुवारच्या तुलनेत काहिशी उलाढाल झाली. तरीही अजूनही म्हणावी तशी स्थिती सुधारलेली नाही. तुळशीविवाहासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत असले तरी सुट्या पैशांअभावी त्यावर मर्यादा येत होत्या.
शुक्रवारी कणकवली बाजारपेठ तुलशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर गजबजलेली होती.
सुट्टे पैसे नसल्यामुळे दैनंदिन गरजा पूर्ण न करता आल्यामुळे अनेक कुटुंबातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. कनेडी व परिसरातील गावामधील लोकही त्रस्त झाले आहेत.
तीन दिवस झाले तरी येथील बॅँकामध्ये नोटा बदलण्यासाठी लोकांची गर्दी दिसत होती. खासगी दवाखान्यात व मेडीकलमध्ये उदारीने व्यवहार होत होते. किराणा दुकानदार आपल्या रोजच्या गिऱ्हाईकांना उदारीने माल पुरवत असल्याने दैनंदिन व्यवहारातील काही प्रमाणात अडथळे कमी झाले होते. त्यांना या नोटा बदलून घेईपर्यंत उधारीवर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यावाचून पर्याय नव्हता. यामुळे सर्वांचीच धावाधाव होत होती.
वृद्ध व आजारी लोकांची सुट्टे पैसे नसल्याने मोठी कुचंबना होत होती. रिक्षाने व बसने प्रवास करतानाही सुट्या पैशांसाठी वादावादी होत होती. तुळशी विवाहाच्या खरेदीकरीता सुट्या पैशांसाठी जिल्हा बॅँकेमध्ये व कनेडी येथील बॅँक आॅफ इंडिया येथे लोकांच्या रांगा लागल्या
होत्या. अशी स्थिती जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत होती. (प्रतिनिधी)
नगरपंचायतीसाठी गुडन्यूज
कणकवली नगरपंचायतीने शहरात रिक्षा फिरवून केलेल्या आवाहनाला नागरिकांंनी प्रतिसाद दिला. सायंकाळी ५.१५ पर्यंत १ लाख ७५ हजार रुपये करापोटी नगरपंचायतीकडे नागरिकांनी भरणा केले. या भरणा केलेल्या रकमेत ५00 व १ हजारच्या नोटा आहेत, अशी माहिती नगरपंचायतीतून प्राप्त झाली आहे. या रकमेपैकी २0 हजार रुपये पाणीपट्टी म्हणून तर १ लाख ५५ हजार घरपट्टीपोटी वसूल झाले आहेत. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी रात्री १२.00 पर्यंत नगरपंचायतीचे अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. दुपारी २ नंतर कर भरणा करणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी तुरळक नागरिक कर भरण्यासाठी येत होते. मात्र दुपारनंतर कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५00 व १ हजार रुपये रद्द करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे नगरपंचायतीला मात्र लाभ झालेला आहे.
नागरिकांकडून प्रतिसाद
कर भरण्यासाठी नागरिकांच्या मागे लागावे लागत असे. मात्र आता नागरिक नगरपंचायतीकडे उत्स्फूर्तपणे कर भरत आहेत. कर भरण्यासाठी तारखा देऊन व नागरिकांच्या मागे लागून कर वसुली अधिकारी वैतागले होते. मात्र त्यात अनेक लोकांनी कर भरला नव्हता, ज्यांनी कर भरला नाही, तेसुध्दा आता कर भरत आहेत. ५00 व १ हजारच्या नोटा रद्द होणार असल्यामुळे सर्वांनीच धसका घेतला आहे. नोटा फुकट जाण्यापेक्षा पाणीपट्टी व करपट्टी भरूया असे म्हणून नागरिक कर भरीत आहेत. नगरपंचायतीत तीन कर्मचारी पैसे स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.
एकंदरीत शहरात गेल्या तीन दिवसांपासून बाजारपेठेत असलेली मंदी शुक्रवारीही दिसून आली. त्यामुळे त्याचा फटका व्यापार, व्यवसायावर झालेला आढळून आला.
सारस्वत बँकेत गर्दी
स्टेट बँकेकडून सारस्वत बँकेला सकाळी ३0 लाख रुपये प्राप्त झाले. हे पैसे सारस्वत बँकेच्या वैभववाडी, कणकवलीतील मुख्य शाखा व रामेश्वर प्लाझामधील शाखांमध्ये विभागले गेले. एटीएम मशीनमधून २ हजार रुपयांपर्यंत १00 रुपयांच्या नोटा येत होत्या. गुरूवारी सारस्वत बँकेत लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
आठ स्वतंत्र कर्मचारी नेमले
लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक व्यवस्थापनाने ८ जण पैसे स्वीकारण्यासाठी ठेवले होते. त्यामुळे पैस भरणा करणे लोकांना सोयीचे झाले. शुक्रवारी गुरूवारइतकी गर्दी नसली तरी पैसे भरणा करण्यासाठी लोकांची रांग लागली होती.

५00 साठी अडवणूक
पेट्रोल पंपावर ५00 ची नोट घेऊन सुटे पैसे परत देण्यास असमर्थता दर्शविली जात होती. तर काही पेट्रोलपंपांवर ५00 ची नोट स्वीकारली जात नव्हती. त्यामुळे किरकोळ वादावादीच्या घटनाही घडत होत्या.

Web Title: The result of market turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.