सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:25 PM2021-12-22T17:25:46+5:302021-12-22T17:26:57+5:30
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल मिळाला. तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली.
सावंतवाडी : तालुक्यात पार पडलेल्या चार ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा निकाल संमिश्र लागला. बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम सावंत तर सांगेली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे श्रीधर लाड विजयी झाले. निरवडेत हरी वारंग व देवसू. दाणोलीत किसन सावंत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. येथील तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तालुक्यातील तब्बल पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी सात ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती जमातीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तर तीन बिनविरोध करण्यात आल्या होत्या. यातील बांदा, सांगेली, देवसू दाणोली, निरवडे ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम पार पडला.
यात चारही ग्रामपंचायतीत एकुण १६२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज, बुधवारी सकाळी येथील तहसिल कार्यालयात मोजणीत झाली. यात एकमेव बांदा ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत राजाराम सावंत ३३२ मते घेऊन विजयी झाले त्याच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत समिर पेळपकर यांना १२३ मते पडली 7 जणांनी नोटाला मतदान केले आहे.
सांगेली ग्रामपंचायतीत महाविकासचे श्रीधर लाड यांना २२५ मते मिळवून विजयी झाले. तर विरोधी भाजप पुरस्कृत अशोक मेस्त्री यांना १४८ मते मिळाली. याठिकाणी ९ जणांनी नोटाचा पर्याय निवडला. देवसू दाणोली ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत किसन सावंत हे १२१ मते घेऊन विजयी झाले, त्याच्या विरोधात असलेल्या धोंडीराम जंगले यांना ६८ मते पडली तर ३ जणांनी नोटाचा पर्याय निवडला.
निरवडे येथील पोटनिवडणूकीत सर्वाधिक जास्त मतदान झाले होते. यात हरी वारंग हे ३६४ मते घेऊन विजयी झाले असून त्याच्या विरोधात असलेल्या दत्ताराम गावडे यांना २१२ मते पडली तर १३ जणांनी नोटाचा पर्याय निवडला होता याठिकाणी झालेला विजय हा गाव विकास पॅनेलचा विजय असल्याचे जेष्ठ गावप्रमुख सदा गावडे यांनी सांगितले आहे.
मतमोजणीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकाल स्पष्ट झाल्यानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.