आचरावासीय गावात परतले

By admin | Published: December 10, 2014 10:15 PM2014-12-10T22:15:50+5:302014-12-10T23:51:00+5:30

गाव भरण्याचा देवाचा कौल : तात्पुरते संसार झटक्यात आवरले

Return to the village of Abacharas | आचरावासीय गावात परतले

आचरावासीय गावात परतले

Next

आचरा : आपल्या विविध रुढी, परंपरा संस्थानी थाटात जपणाऱ्या आचरा गावची गावपळण इनामदार श्री देव रामेश्वराने बुधवारी तीन रात्रींचा मुक्काम पार पडल्यानंतर गावात परतण्याकरीता कौल दिल्याने अत्यंत उत्साहात समाप्त झाली. श्री रामेश्वर मंदिरात गाव भरण्याचा तोफेचा इशारा होताच संपूर्ण गाव सहजीवनाचा अनोखा आनंद गाठीशी बांधत माघारी परतले.
दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरीता यावर्षी कौल दिल्याने ७ ते १० डिसेंबर या कालावधीत ही गावपळण पार पडली. मुंबईचे चाकरमानी, नातेवाईक, शेजारी गावातील लोक या गावपळणीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते.
पारवाडी नदीकिनारी, भगवंतगड सीमांबा, आडबंदर, वायंगणी माळरानावर, चिंदर सडेवाडी आदी ठिकाणी आचरावासीयांनी झोपड्या उभारून आपले तात्पुरते नवे संसार थाटले होते. उत्तरोत्तर या गावपळणीची रंगत अधिकच वाढत गेली होती. आधुनिक काळातील रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आचरावासीयांनी एकमेकांच्या सान्निध्यात कोणत्याही कामकाजाव्यतिरिक्त मोकळेपणाने घालविले होते. सध्याचे जीवनमान एवढे व्यस्त झालेले आहे की, शेजारी पाजारी कित्येक वर्षे एकमेकांना मनमोकळेपणाने भेटू शकत नाहीत. असे असताना गावपळण ही प्रथा आचरावासीयांना हवीहवीशी वाटते. आज गावी न परतण्याचा रामेश्वराचा कौल झाल्यास एक रात्रीचा मुक्काम वाढणार होता. परंतु या तीन रात्रींच्या मुक्कामानंतर रामेश्वराचा गाव भरण्याचा कौल झाल्याने आचरावासीय बुधवारी मिळेल त्या वाहनाने आपल्या मूळ घराकडे धाव घेऊ लागले. रामेश्वराने गाव भरण्याचा कौल दिल्याची वार्ता क्षणार्धात पसरताच सर्वांनी ठिकठिकाणी थाटलेले आपले तात्पुरते संसार एका झटक्यात आवरते घेतले.
गावपळण कालावधीत रानावनात, काट्याकुट्यात वास्तव्य करून राहणाऱ्या आचरावासीयांना कित्येक वर्षांच्या अनुभवाप्रमाणे श्री रामेश्वरावर असलेल्या त्यांच्या नितांत श्रद्धेमुळे कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागले नाही. जुन्या जाणत्या आचरावासीयांना याविषयी विचारणा केली असता, आचरा गावपळण श्री रामेश्वरावर असलेल्या श्रद्धेपोटी आम्ही करत आहोत. त्यांनी आमची संपूर्णत: जबाबदारी घेतली असल्याने इतक्या वर्षांच्या गावपळणीच्या इतिहासात कोणताच वाईट प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाव भरण्याचा कौल क्षणार्धात आचरावासीयांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी तत्काळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. गावपळणीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले आचरावासीय हळूहळू माघारी परतणार आहेत. गुरुवारी आचरा गावचे जीवनमान पूर्वपदावर येणार आहे. (वार्ताहर)

आचरा गावच्या वेशीबाहेर तीन दिवसांकरीता थाटलेला झोपडीतील संसार ग्रामस्थांनी गावात परतण्यासाठी आवरता घेतला. गावपळणीनिमित्त वेशीबाहेर राहिलेले आचरावासीय आता नव्या दमाने गावात परतले आहेत.


पोलिसांचे सहकार्य
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कारकिर्दीतील पहिलीवहिली गावपळण आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेंद्र शिंदे यांनी अत्यंत संयमाने व आपल्या अनोख्या कार्यशैलीने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत हाताळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकठिकाणी घडणाऱ्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस मुख्यालयातून जादा फौजफाटा मागवत त्यांच्या सहकार्याने अत्यंत सुव्यवस्थित बंदोबस्त राखत गावपळण पार पाडण्याकरीता आचरावासीयांना मोलाचे सहकार्य केले. गावपळण कालावधीत कोणताही अनुचित प्रकार न घडता आचरा भागाची संपूर्ण नाकाबंदी करत प्रत्येक वाडीत दोन जादा पोलीस कर्मचारी तैनात ठेवले होते.

Web Title: Return to the village of Abacharas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.