९३ कोटींचा महसूल जमा
By admin | Published: April 2, 2015 01:08 AM2015-04-02T01:08:22+5:302015-04-02T01:26:05+5:30
दिलीप मोरे : जिल्ह्यातील उत्पादन शुल्क कारभाराची माहिती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते अद्यापपर्यंत साडेचार वर्षात तब्बल ९३ कोटी ४० लाख रूपयांचा महसूल शासनास जमा केला आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसताना हा एवढा मोठा महसूल गोळा करण्यास यश आले असल्याची माहिती जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक दिलीप मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.दिलीप मोरे हे येत्या चार महिन्यात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आपण केलेल्या सेवेची माहिती देण्यासाठी त्यांनी बुधवारी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
मोरे म्हणाले, आपण २१ आॅक्टोबर २०१० रोजी येथील विभागाचा अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी येथील महसूल हा जेमतेम १८ कोटी एवढा गोळा करण्यात येत होता.
मात्र, मी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ठिकठिकाणी अनधिकृत दारू वाहतूक करणाऱ्या वाहतुकीवर बऱ्यापैकी निर्बंध आणत जिल्ह्याचा महसूल १८ कोटींवरून २३.६४ कोटींपर्यंत नेला.
यामध्ये सन २०११-१२ मध्ये २३.६४ कोटी, २०१२-१३ मध्ये २३.३८ कोटी, २०१३-१४ मध्ये २२.८६ कोटी, २०१४-१५ मध्ये २३ कोटी ५३ लाख एवढा असा मिळून ९३ कोटी ४० लाखाचा महसूल गोळा करण्यात यश आले आहे. (प्रतिनिधी)
७७ वाहने केली जप्त
पारदर्शक भरती प्रक्रिया
माझ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोनवेळा भरती प्रक्रिया केली. यात कोणतीही हेराफेरी झाली नाही. यात जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन महिला पोलीस शिपायांना प्राधान्य देण्यात आले. भरती प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी त्यांना मोफत दोन महिन्यांचे मार्गदर्शन केले असल्याची माहितीही यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक दिलीप मोरे यांनी
दिली.
९ पदे रिक्त
वेळच्यावेळी कर्मचाऱ्यांची पदे भरली गेली व वाहने सुस्थितीत असतील तर जिल्ह्याच्या महसुलात वाढ होईल.
मात्र, जिल्ह्यात या विभागात ४ पोलीस निरीक्षकाची, २ पोलीस उपनिरीक्षकाची व ३ पोलीस शिपायाची पदे रिक्त असल्याने तसेच ५ पैकी ३ गाड्या उपलब्ध नसल्याने महसूल गोळा होण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याची खंतही यावेळी मोरे यांनी व्यक्त केली.
अनधिकृत दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या ७७ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
या वाहनांमध्ये ट्रक, टेम्पो, बस, कार या वाहनांचा समावेश आहे.
तर अद्यापपर्यंत ७ वाहनांची लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री करण्यात आली आहे, अशी माहिती दिलीप मोरे यांनी दिली.
गेल्या साडेचार वर्षात जप्त करण्यात आलेल्या वाहन, दारू, हातभट्टी, लिकर असा मिळून तब्बल ६ कोटी ४५ लाख ५२ मुद्देमाल जप्त केला.