धनादेशांना ‘रिव्हर्स गिअर’
By admin | Published: September 23, 2015 09:44 PM2015-09-23T21:44:54+5:302015-09-24T00:13:09+5:30
रत्नागिरी : बँक खात्याचा नंबर चुकीचा दिल्याने फटका
रत्नागिरी : रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदत आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप करण्यात आले आहे. मात्र, बँक खात्याचा नंबर चुकीचा असल्याच्या कारणावरून आतापर्यंत २५६ धनादेश परत आल्याने एकूण ४४,०६,२६५ रुपयांचे वाटप थांबले आहे. रत्नागिरीतील आंबा बागायतदारांचे अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून मदतही देण्यात आली आहे. या मदतीच्या धनादेशांचे तहसील कार्यालयाकडून वाटप सुरू आहे. मुळात रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून वाटपाला विलंब झाला होता. सुरूवातीचा मंजूर झालेला १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपयांचा निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड पडला होता. त्यानंतर सप्टेंबरपासून नुकसानभरपाई वाटपास गती आली आहे. जिल्ह्यात १०,७७५ खातेदार आहेत. त्यापैकी येथील तहसील कार्यालयाकडून एकूण ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढण्यात आली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६३३ खातेदारांची एकूण १,१२,४२,२४६ रुपयांची तसेच दुसऱ्या टप्प्यात ७२९ खातेदारांची १,१३,४५,०७६ एवढ्या रकमेची बिले बँकेकडे पाठवण्यात आली आहेत. मात्र, या १३६२ खातेदारांपैकी ११०६ खातेदारांना एकूण १,८१,६३,३०१ रुपयांचे वाटप झाले आहे. मात्र, बँकखाते क्रमांक चुकीचा असल्याच्या कारणावरून २५६ खातेदारांचे धनादेश मागे आले आहेत. त्यामुळे या धनादेशापोटी ४४,०६,२६५ एवढे वाटप थांबले आहे.आता तिसऱ्या टप्प्यात तहसील कार्यालयाकडून ६५५ खातेदारांचे एकूण १,०५,२१,८४३ रुपयांचे बिल बँकांकडे पाठवण्यात आले असून, त्याचे वाटप आता सुरू आहे. ज्यांचे धनादेश परत आले आहेत. त्यांचे खाते क्रमांक दुरूस्त करून ते पुन्हा त्यांच्या बँकांकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.तालुक्यात एकूण १०,७७५ इतके खातेदार आहेत. आतापर्यंत जेमतेम १३६२ खातेदारांना वाटप करण्यात आले आहे. वैयक्तिक खातेदारांच्या वाटपामध्ये कुठलीच अडचण नसली तरी सामूहिक खातेदारांना वाटप करण्यात अतिशय अडचणी येत आहेत. त्यामुळे वाटपास विलंब होत असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आतापर्यंत २५६ धनादेश परत
धनादेश परत आल्याने ४४ लाख ६ हजार २६५ रूपयांचे वाटप थांबले.
सुरुवातीला निधी कोकण आयुक्त कार्यालयाकडे गेल्याने वाटपात खंड़
तहसील कार्यालयाकडून ३ कोटी ३१ लाख ९ हजार १०५ रूपयांची बिले काढली.
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी आलेल्या मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तहसील कार्यालयाकडून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचा खाते नंबर चुकीचा दिल्याने हा धनादेश परत येत आहे. त्यामुळे पुन्हा वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.