सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:40 PM2020-09-12T14:40:18+5:302020-09-12T14:43:45+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली असून मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शविली असून मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
लवकरच याबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणला जाणार आहे. त्या अनुषंगाने या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्य सचिव लवकरच सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी
दिली.
मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव उदय चौधरी यांनी त्या विभागांच्या सचिवांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मुद्यांची सद्यस्थिती व करावयाच्या उपाययोजना याबाबतची तातडीने माहिती सादर करण्यास कळविले आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत बैठक होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रशासकीय पातळीवर या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
लवकरच याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर यांनी आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा रुग्णालय ३०० खाटांचे रुग्णालय असून वैद्यकीय महाविद्यालयाकडे येथील इमारती, जागा, मालमत्ता अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचे हस्तांतरण करण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालक आणि सहसंचालकांकडे मार्गदर्शन मागविले आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालय परिसरात शासकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अस्तित्वात असलेल्या अनिवासी व निवासी इमारती, आवारातील मोकळी जागा, रुग्णालयीन विभाग आणि उपलब्ध यंत्रसामुग्री याची पाहणी २७ सप्टेंबर २०१६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय समितीने केली होती. त्यांनी याबाबतचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई यांच्याकडे सादर केला होता.
शासकीय महाविद्यालयाबाबत हालचालींना वेग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सकारात्मक असून कोविड तपासणी लॅबच्या उद्घाटनावेळीही त्यांनी सिंधुदुर्गात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर या शासकीय महाविद्यालयाबाबत हालचालींना वेग आला आहे, असेही आमदार नाईक यांनी या म्हटले आहे.