‘सती चंद्रसेना’ नाटकाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: June 28, 2015 11:11 PM2015-06-28T23:11:33+5:302015-06-28T23:11:33+5:30
कुडाळातील मान्सून महोत्सव : लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने आयोजन
कुडाळ : येथील सुरुवात झालेल्या मान्सून महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील संयुक्त दशावतार नाट्यकलावंतांनी सादर केलेल्या ‘सती चंद्रसेना’ नाटकाने उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकात ज्येष्ठ दशावतारी कलाकार राधाकृष्ण नाईक यांनी सादर केलेली हनुमंताची भूमिका रसिकांच्या मनात वेगळा ठसा उमटवून गेली.
कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्यावतीने गेली दोन वर्षे मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या तिसऱ्या मान्सून महोत्सवाचे आयोजन कुडाळ येथील सिध्दिविनायक सभागृहात २७ व २८ जून रोजी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवात जिल्ह्यातील दिग्गज दशावतारी कलाकार एकत्र येत संयुक्त दशावतार नाटक सादर करतात. यावर्षी या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांनी संयुक्त दशावतार ‘सती चंद्रसेना’ हे नाटक सादर केले.
प्रत्येक भूमिकेला शोभिवंत अशी पात्रे, शब्दावर प्रभुत्त्व, सुंदर अभिनय याचबरोबर उत्कृ ष्ट रंगभूषा व वेशभूषा या सर्वांमुळे हे नाटक म्हणजे एक उत्कृष्ट कलाकृती उपस्थित हजारो पे्रक्षकांना पहायला मिळाली.
पावसाळ्यात शेतीची कामे आटोपल्यानंतर येथील शेतकरी व जनतेला दशावतारी नाटक पाहता यावे, याकरिता राजेश म्हाडेश्वर यांच्या संकल्पनेतून या मान्सून महोत्सवाची कल्पना सूचली. याला सिंधुदुर्ग व गोव्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नाट्यप्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. नाटकात पांडुरंग कलिंगण (गणपती), प्रथमेश परब (रिध्दीसिध्दी), हरिश्चंद्र गावकर (राम), सुधीर कलिंगण (लक्ष्मण), राधाकृष्ण नाईक (हनुमंत), प्रशांत मेस्त्री (मगर), ओमप्रकाश चव्हाण (चंद्रसेना), महेश गवंडे (रावण), बाबा कामत (अहिरावण), दादा कोनसकर (महिरावण), मकरध्वज (तुकाराम गावडे) या इतर कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. (प्रतिनिधी)
प्रत्यक्ष हनुमंत अवतरल्याचा भास
या नाटकात अहि-महि असूर राम व लक्ष्मण यांचे अपहरण करतात. त्यांना सुरक्षित आणण्यासाठी हनुमंताची सुरू असलेली धडपड व आपल्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची ओढ तसेच हनुमंतासारख्या उड्या, खांबावर चढणे यासारखा हनुमंताला शोभेल असा अभिनय, उत्कृष्ट रंगभूषा, वेशभूषा यामुळे रंगमंचावर प्रत्यक्ष हनुमंत अवतरल्याचा भास प्रेक्षकांना होत होता. ही भूमिका सुंदररित्या साकारलेल्या राधाकृष्ण नाईक यांचे कौतुक प्रेक्षक वर्गातून होत होते.