तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:26 PM2017-10-23T17:26:10+5:302017-10-23T17:35:32+5:30
कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक अगदी दंग झाले होते.
सुधीर राणे
कणकवली, दि. २३ : येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक अगदी दंग झाले होते.
प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येणारी गंधर्व मासिक शास्त्रीय संगीत सभा चोखंदळ रसिकांसाठी एक महापर्वणीच ठरत आहे. अगदी अल्पावधीतच या गंधर्व मासिक संगीत सभेने नावलौकिक मिळविला आहे. आतापर्यन्त अनेक प्रतिथयश कलाकारानी या संगीत सभेत हजेरी लावून आपली कला रसिकांसमोर सादर केली आहे. त्यांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. बुजुर्ग कलाकारानी केलेल्या मार्गदर्शनामुळे नवोदित कलाकाराना आपली कला जोपसताना एक दिशा मिळाली आहे.
अशिये मठ येथे झालेल्या वाद्य मिलाफ या कार्यक्रमात प्रसिध्द तबला वादक रक्षानंद पांचाळ यांनी तबला एकल वादन केले. त्यात देव स्तुतीपरन, पेशकार, कायदे, रेले, गत, चक्रधार आदी वादन प्रकार त्यानी सादर केले आणि रसिकांची वाहवा मिळविली. रक्षानंद पांचाळ यांना निनाद जोशी यांनी हार्मोनियमवर साथ केली.
अलीकडेच नावारुपाला येणारे रक्षानंद पांचाळ यांचे तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण बाबी अन्सुरकर व सूर्या शेट्ये यांच्याकडे झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण गोवा, पणजी येथील संगीत महाविद्यालयात उल्हास वेलंगीकर व पं. प्रभाकर च्यारी यांच्याकडे झाले. सध्या मुंबई येथे पं. मोहन बळवल्ली यांच्याकडे ते पुढील शिक्षण घेत आहेत. तसेच आपल्याला अवगत असलेल्या कलेचे मार्गदर्शन अनेकांना करीत आहेत.
तबला एकल वादनानंतर रक्षानंद पांचाळ यांच्या सोबत त्यांच्या शिष्यानी वेगवेगळ्या ताल वाद्यांचे एकत्रित वादन केले. वाद्य मिलाफ या कार्यक्रमामध्ये तबला, पखवाज, ढोलकी, कख्वॉन या सगळ्या वाद्यांच्या वादनाचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी गणेश परन, दत्तगुरु स्तुती परन तसेच प्रत्येक वादकाने सोलो सादर केला. त्यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
या वाद्य मिलाफ कार्यक्रमात पखवाज रक्षानंद पांचाळ, ढोलकी प्रफुल्ल शिंदे , तबला प्रतीक भगत, तर कख्वॉन वादन तन्मय चव्हाण यांनी केले. कख्वॉन हे एक स्पॅनिश वाद्य आहे. ते बऱ्याच रशियन कार्यक्रमात वापरले जाते. साधारणत: 'ड्रम' सारखा आवाज काढणाऱ्या लाकड़ी खोक्यात तारा बसविलेल्या असतात. या वाद्यातून सुमधुर असे बोल उमटतात. त्याचा आस्वाद प्रथमच कणकवलीतील रसिकाना घेता आला. त्यामुळे अनेक रसिकानी समाधान व्यक्त केले.
कणकवली तालुक्यातील आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे वाद्य मिलाफ कार्यक्रमात विविध वाद्यांचे एकत्रित वादन करण्यात आले.