नितेश राणेंनी माझ्यावर आरोप करणे हास्यास्पद!, अतुल रावराणे यांचा टोला
By सुधीर राणे | Published: March 29, 2023 06:08 PM2023-03-29T18:08:25+5:302023-03-29T18:09:01+5:30
ठेकेदाराकडून अथवा कामात कमिशन घेऊन व्यवसाय उभे केले नाहीत
कणकवली: आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर आरोप करणे ही गोष्टच हास्यास्पद आहे. आयकर विभागात नोकरीला असलेल्या आमदारांच्या वडिलांनी १५० कंपन्या कशा काय सुरू केल्या? त्याचे नेमके गमक काय? माझे व्यवसाय हे माझ्या मनगटातील ताकदीवर उभे आहेत. कोणत्याही ठेकेदाराकडून अथवा कामात कमिशन घेऊन मी व्यवसाय उभे केलेले नाहीत. नितेश राणेंमुळेच जिल्हा विकासाला खिळ बसली आहे असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी केला.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माझ्यावर टीका करणाऱ्या या स्थानिक आमदाराने कोणाकडून कमिशन मागितले. त्याबाबतचा मागील दहा वर्षाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. विकास कामांसाठी स्वतः निधी आणल्याचे हे आमदार सांगतात. मात्र निधी आणण्याची ताकद आणि कर्तुत्व यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी आणलेल्या निधीतून लोणी खाण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
फणसे, पडवणे भागातील आंबा बागायतदारांच्या बागांना आगी लागून नुकसान झाले. मला माहिती मिळताच मी तातडीने तेथे जाऊन पाहणी केली. महावितरणला याबाबत कल्पना देऊन, तलाठ्यांना बोलावून पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली. मी हे करत असताना हे आमदार मात्र भूमिपूजन करत फिरत होते. तेथील शेतकऱ्यांनी याबाबत त्यांना विचारल्याने माझा दौरा त्यांना झोंबला. त्याच्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत.
स्वतःची पात्रता ओळखा
माझी लायकी काढताना अगोदर स्वतःची पात्रता काय ते त्यांनी ओळखावे. आंगणेवाडी येथील सभेत या आमदार व त्यांच्या परिवाराची पात्रता भाजपने दाखवून दिली आहे. शिवसेनेत पक्षाची घटना आहे. त्यानुसार जबाबदारी दिली जाते. त्याला आम्ही बांधील असू. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिली असून सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणे, पक्ष संघटना वाढवणे हे माझे काम आहे. शिवसेनेपूर्वी मी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काम केले. भाजपमधील लोक आजही मला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवतात, मानसन्मान देतात. मात्र, हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात, तिथे यांना परत कोणीच बोलवत नाही असा टोलाही रावराणे यांनी लगावला.