बारकोड नोंदीनंतरच दाखल्यावर सही
By admin | Published: May 21, 2015 10:42 PM2015-05-21T22:42:45+5:302015-05-22T00:15:25+5:30
सुशांत खांडेकर : महसूल खात्याला आली जाग
राजापूर : तीन महिन्यांपूर्वी राजापुरात खळबळ उडवून देणाऱ्या जातीच्या बनावट दाखल्याच्या प्रकरणानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बारकोडची आॅनलाईन नोंद झाल्याशिवाय दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे सेतू कार्यालयातून वितरित होणाऱ्या दाखल्यांच्या रजिस्टरचीही नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे खांडेकर यांनी म्हटले आहे.
राजापुरातील महा - ई सेवा केंद्रातून जातीच्या बनावट दाखल्याचे वितरण करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणामुळे महसूल खात्यावर टीकेची चौफेर झोड उठली होती. महसूल खात्याच्या कारभाराचा हा पंचनामाच असल्याच्या प्रतिक्रियाही तालुकाभरातून व्यक्त होत होत्या. तीन महिन्यानंतर का होईना महसूल प्रशासनाने यातून बोध घेतला आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पावले उचलली आहेत.
दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल. या प्रवेशासाठी विविध दाखले आवश्यक असतात. त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही विविध दाखल्यांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर सेतू व महा-ई सेवा केंद्रामध्ये आतापासूनच गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी खांडेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आॅनलाईन नोंद केलेल्या दाखल्यावर बारकोड नसेल तर अशा दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. सेतू कार्यालयातून वितरीत होणाऱ्या दाखल्यांची नोंदणीनिहाय तपासणी केल्यानंतरच या दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाईल, असे खांडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता तरी बनावट दाखल्यांची प्रकरणे थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी).