रास्त धान्य दुकानदारांना न्याय मिळवून देणार
By admin | Published: October 26, 2015 11:22 PM2015-10-26T23:22:51+5:302015-10-27T00:07:15+5:30
नीतेश राणे : कणकवलीतील रास्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारकांचे निवेदन
कणकवली : तालुक्यातील रास्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी विविध मागण्यांचे निवेदन आमदार नीतेश राणे यांना सोमवारी सादर केले. तसेच या समस्या शासन दरबारी मांडून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. दरम्यान, या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याच्यादृष्टीने यापण निश्चित प्रयत्न करु, असे राणे यांनी सांगितले.
रास्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक याना विविध समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसायही ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. काहीजणांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय रास्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली. तसेच त्याना निवेदनही दिले. यावेळी संघटनेचे तालुका सचिव सुदर्शन फोपे, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे अध्यक्ष संदीप नलावडे, उपाध्यक्ष अण्णा कोदे, राजीव पारकर, प्रफुल्ल कामत, यशवंत पारकर, गजानन शिंदे, शैलेंद्र डिचोलकर, विजय सावंत, संदीप मेस्त्री, राकेश परब आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे. यामध्ये कणकवली तालुक्यातील रास्त धान्य दुकानदाराना आॅक्टोबर महिन्यात रेशन कार्ड धारकाना वितरित करण्यासाठी मिळणारे धान्य २६ आॅक्टोबरपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या रोषास विनाकारण या दुकानदाराना जावे लागत आहे. त्यामुळे आॅक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याचा धान्यसाठा वितरणासाठी एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध करुन देण्यात यावा. धान्य व साखर वितरणाबाबत मिळणारे कमीशन अत्यल्प आहे. या कमिशनमधून हमाली, मापारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे पगार देणे परवडत नाही. त्यामुळे ते वाढवून मिळावे. केरोसीन वितरणातून मिळणाऱ्या कमिशनचीही अशीच स्थिती आहे. ते ही वाढवून मिळावे. धान्य तसेच साखर उचल करताना हमाल ५0 किलो साठी २ रुपये ५0 पैसे हमाली घेतात. तर माल उतरताना स्थानिक हमाल ५0 किलोसाठी ५ रुपये घेतात. ही हमाली शासनाने दुकानदाराना द्यावी. अशा विविध मागण्यांचा समावेश
आहे.(वार्ताहर)