उधाणाचा जोर ओसरला

By admin | Published: June 14, 2014 01:19 AM2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30

देवबागवासीयांचा सुटकेचा नि:श्वास

Rising thrusts back | उधाणाचा जोर ओसरला

उधाणाचा जोर ओसरला

Next

मालवण : येत्या २४ तासांत मान्सून सक्रिय होईल, असा हवामान खात्याने मान्सूनबाबत वर्तविलेला अंदाज फोल ठरला आहे. मात्र, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असून, मालवणमधील भीतीच्या छायेखाली वावरणाऱ्या देवबागवासीयांनी उधाणाचा जोर कमी झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आज, शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा होत होता.
गेले तीन-चार दिवस चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण व देवगड बंदरांत तुफानसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात अजस्त्र लाटांनी तांडवनृत्य केल्याने किनारपट्टी हादरून गेली होती. त्यातच पौर्णिमा असल्याने समुद्राला तुफान होते.
आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरती असल्याने समुद्राच्या लाटांमध्ये वाढ होईल, असा अंदाज होता. मात्र, वाऱ्याचा जोर कमी असल्याने लाटांचाही जोर कमी झाला. नेहमीपेक्षा आज समुद्रलाटांची उंची काहीशी जास्त होती. मात्र, उधाणाचा जोर कमी झाल्याने किनारपट्टीवरील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काल, गुरुवारी समुद्राच्या लाटा देवबाग येथील वस्तीत घुसल्या होत्या. संरक्षक बंधाराही या लाटांनी उद्ध्वस्त केला होता. समुद्राच्या लाटांनी वाहून गेलेला बोटीवरील एक टीव्ही संच देवबाग येथील मनोज खोबरेकर यांच्या जागेत आढळून आला. खोबरेकर यांच्या घरामागील बंधाराही लाटांनी उद्ध्वस्त केला असून, हीच परिस्थिती देवबाग ख्रिश्चनवाडीतील बंधाऱ्याचीही आहे. (प्रतिनिधी
तीन नंबरचा बावटा
समुद्रात उधाण असल्याने ते दर्शविणारा तीन नंबरचा बावटा प्रशासनाच्या वतीने
गेले तीन दिवस लावण्यात आला होता; मात्र आज, शुक्रवारपासून तो उतरविण्यात आला आहे.

Web Title: Rising thrusts back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.