तिलारी घाटातील निम्मा रस्ता खचल्याने घाट वाहतुकीस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:32 PM2019-07-05T17:32:57+5:302019-07-05T18:02:50+5:30
नजीकच्या गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्याला कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट शुक्रवारी पहाटे कोसळला.
दोडामार्ग : नजीकच्या गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्याला कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने या वेळी वाहतुकीची वर्दळ नसल्याने कोणताही अपघात झाला नाही. मात्र निम्मा रस्ता खचल्याने हा घाट वाहतुकीसाठी अनिश्चित काळाकरिता बंद करण्यात आला आहे.
दोडामार्ग आणि पर्यायाने गोवा राज्याला घाट माथ्याशी अर्थात कोल्हापूर जिल्ह्याची जोडण्यात तिलारी घाट महत्त्वाचा आहे. अत्यंत नागमोडी वळणे आणि अति तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवघड घाट अशी ओळख या घाटाची आहे. रामघाट या नावानेही या घाटाला ओळखले जाते. तिलारी प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीचे ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केला होता. गेली 35 वर्षे हा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात होता.
मात्र गेल्या वर्षीच बांधकाम विभागाने हा घाट आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूर विभागाकडे वर्ग केला. त्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. जवळपास तीन कोटी रुपये खर्ची घालून घाटातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. तर चार महिन्यापूर्वी संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे घाटातील वाहतूक वर्षभरापासून वाढली होती. अत्यंत जवळचा रस्ता असल्याने बेळगाव व कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणी जाणारी बरीचशी वाहतूक या मार्गाने होत होती. शिवाय आंबोली घाटाला पर्याय म्हणून तिलारीकडे पाहिले जात होते. मात्र शुक्रवारी पहाटे हा घाट कोसळला.
शुक्रवारी पहाटे कोंबड्यांची गोव्याकडे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घाट कोसळल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर या ठिकाणी दगड ठेवून उपाययोजना करण्यात आली. मात्र हा रस्ता निम्मा खचल्याने आणि पावसात आणखीन खचण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. घाटाच्या पायथ्याशी व माथ्यावर दोन्हीकडे घाट बंद असल्याचे वाहनचालकांना सूचित करण्यासाठी पोलिस कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
जिओच्या केबल खोदाईचा घाटाला फटका?
जिओ कंपनीच्या केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करण्यात आली होती. या खोदाई वेळी घाट रस्त्याला धक्का बसला. केबल टाकल्यानंतर चर बुजवण्यात आले. मात्र बाजू पट्टी भक्कम करण्यात आली नाही त्यामुळे पावसाचे पाणी आत मध्ये झिरपून नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यासह रस्ता कोसळला आणि घाट वाहतुकीस बंद झाल्याचा अंदाज वाहनचालकांमध्ये वर्तविला जात आहे.
लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव
तिलारी घाट कोसळल्याचे समजतात तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सेनेचे उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे, शैलेश दळवी, बाबा जुवेकर, खानयाळे सरपंच विनायक शेट्ये आदींनी कोसळलेल्या घाटाची पाहणी करीत या दुर्घटनेला जिओचा ठेकेदार कारणीभूत असल्याचा आरोप केला.
मातीचा गाळ रस्त्यावर
तिलारी घाट कोसळल्यामुळे या घाटातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. ज्या ठिकाणी हा रस्ता खचला तिथून शंभर फूट खोल दरीत रस्त्याचा असलेला भाग, माती, दगड, गाळ व झाडे रस्त्यावर खालच्या बाजूला पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आली त्यामुळे रस्ता गाळाने माखला होता.