आरवली येडगेवाडी रस्ता धोकादायक
By admin | Published: January 23, 2016 11:28 PM2016-01-23T23:28:23+5:302016-01-23T23:28:23+5:30
‘बांधकाम’चे दुर्लक्ष : मोरी मोडकळीला आल्याने धोका
चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येडगेवाडी हा प्रमुख रस्ता धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्यावरील कुचांबे - बौध्दवाडी येथील मोरी मोडकळीस आली आहे. ही मोरी कधीही कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या मार्गावरुन सध्या एस. टी.च्या पाच फेऱ्या होतात. या मार्गावर कुटगिरी, राजीवली, रातांबी या तीन गावातील ६३हून अधिक शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी दररोज प्रवास करतात. या मार्गावरील एस. टी. अथवा अन्य वाहतूक बंद झाल्यास विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. ही बाब प्रवाशांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता. मात्र, शासनाने जिल्ह््यातील प्रमुख सर्व मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर केले. त्याअगोदर जिल्हा परिषदेकडून या मोरीच्या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी या मोरीचे १६ लाखाचे अंदाजपत्रक तयार करुन मंजुरीसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठवले होते. मात्र, हा प्रमुख मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर अंदाजपत्रक आणि मंजुरी हा विषय थांबवण्यात आला.
जिल्हा परिषदेकडे हा रस्ता असताना तुकाराम येडगे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. जिल्हा परिषदेने हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या गडनदी प्रकल्पामुळे खराब झाला असल्याचे नमूद करत, यासाठी पाटबंधारे विभागाने या मोरीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.
येडगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मोडकळीस आलेल्या पुलाच्या ठिकाणी भेट दिली व पुलाची पाहणी केली. मात्र, नंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हा प्रस्ताव रखडला व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोरीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले.
कुचांबे (बौध्दवाडी) येथील मोरीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व उपअभियंता यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या मोरीची पाहणी करुन घेतो, असे आश्वासन दिले. या आश्वासनाला महिना उलटून गेला तरीही सार्वजनिकचे कोणतेही अधिकारी याठिकाणी फिरकले नाहीत. या मार्गावरील मोडकळीला आलेल्या मोरीचा साकव कार्यक्रमात समावेश करुन ही मोरी या हंगामात बांधून घ्यावी. अन्यथा या मार्गावरील वाहतूक बंद होऊन विद्यार्थी व तीन गावातील रहिवाशांना याचा फटका बसणार आहे.
या विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास तीन गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरुन सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे तुकाराम येडगे व सचिन पाटोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)