मांडुकलीतील रस्त्यावरील पाणी ओसरले; कोल्हापूर मार्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:56 PM2019-09-10T15:56:13+5:302019-09-10T15:56:59+5:30
वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र वैभववाडी-फोंडा मार्गावर आकेशियाचे झाड कोसळले असून ते झाडांमध्येच अडकून असल्याने धोका निर्माण झाला आहे.
वैभववाडी : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील रस्त्यावरचे पाणी ओसरल्याने तब्बल २१ तासांनंतर सोमवारी सकाळी तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यामुळे रविवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, वैभववाडी तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र वैभववाडी-फोंडा मार्गावर आकेशियाचे झाड कोसळले असून ते झाडांमध्येच अडकून असल्याने धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून सुरू केलेला विसर्ग यामुळे कोल्हापूर परिसरात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील मांडुकली येथे रविवारी सकाळी रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे मांडुकलीत जाऊन शेकडो वाहनांना माघारी परतावे लागले होते.
या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी पहाटे पाच वाजता मांडुकली येथील रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरले. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तशाप्रकारचा संदेश गगनबावडा पोलिसांनी वैभववाडी पोलिसांना दिला आहे.
तालुक्याच्या काही भागात सकाळी पाऊस झाला. परंतु दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, दुपारी वैभववाडी-फोंडा मार्गावर कुर्ली फाट्यानजीक आकेशियाचे झाड कोसळले आहे. मात्र, ते झाडांवर अडकून आहे. झाड धोकादायक स्थितीत असल्याने या मार्गावरील वाहतुकीला धोका उद्भवण्याची शक्यता दिसत आहे.