चाटव येथे रस्त्याचे काम पाडले बंद
By admin | Published: March 3, 2015 09:22 PM2015-03-03T21:22:22+5:302015-03-03T22:17:40+5:30
नियमबाह्य काम : ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची ग्रामस्थांची मागणी
खेड : खेड तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. विशेषत: वरवली ते चाटव दरम्यान रस्त्याची झालेली वाताहात थांबवण्यासाठी या कामाला हिरवा कंदिल मिळाला, मात्र ठेकेदाराने हे काम पूर्णपणे नियमबाह्यरित्या केल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात आला आहे. रस्त्यावर कोटींग न करताच न थेट डांबर टाकल्याने हा रस्ता आता वादात सापडला आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सूचना देत अखेर हे काम बंद पाडले आहे़ या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे़मार्च २०१४मध्ये वरवली ते चाटव या रस्त्याचे कामाला मंजुरी मिळाली होती. दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी ४० लाख रूपये मंजूर झाले आहेत. या कामाची मुदत जून २०१४मध्ये संपली होती. या रस्त्याची पुरती वाताहत झाल्याने हे काम तातडीने होणे आवश्यक होते. ठेकेदार व्ही. एन. पवार यांनी हे काम घेतले आहे. ६ महिन्यामध्ये ठेकेदाराने केवळ ५९ मीटर रस्त्यावर खडी पसरवून काम बंद केले.याबाबत आंबवली व परिसरातील काही सरपंच आणि ग्रामस्थ तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना याबाबत जाब विचारला होता. यावेळी परिस्थिती पाहून ठेकेदाराने हे बंद असलेले काम २६ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुरू केले. हे काम करताना रस्त्यावरील साफसफाई केली नाही. टेकिंग कोट न करताच खडी पसरवली.याबाबत संतापलेल्या विजय कदम यांनी ठेकेदार पवार यांना विचारताच पवार यांनी उद्दामपणे उत्तरे दिली. कदम यांचा अवमान केल्याने वातावरण काहीसे तापले. यावेळी ठेकेदाराने काणेतेही कोटींग न करताच मातीतच डांबरीकरण सुरू केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.या रस्त्याचे काम पाहण्यासाठी ग्रामस्थ आले असता, त्यांच्यासमोरच पवार यांनी डांबरीकरणाचे काम सुरू केले़ अखेर या रस्त्याची पाहणी करण्यास आलेल्या आंबवली, हुंबरी, वाडीबीड, सणघर, वरवली आणि नांदीवली येथील संतापलेल्या ग्रामस्थांनी मात्र हे काम रोखून धरले. यावेळी या कामाची प्रत तपासावी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात
आली.
याशिवाय आंबवली ते वरवली या ४०० मीटर अंतरावरील झालेल्या १० लाख रूपये किंमतीच्या रस्ता डांबरीकरण काम वाहून गेल्याने या कामाचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निस्तुरे यांनी या ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी संयमी भूमिका घेतल्याची माहिती चाटव आणि वरवली येथील ग्रामस्थांनी दिली आहे. (प्रतिनिधी)