मालवण शहरातील रस्ते झाले दोन तास स्तब्ध; पंतप्रधान जाणाऱ्या मार्गावरून प्रशासनाची रंगीत तालीम
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 2, 2023 07:36 PM2023-12-02T19:36:38+5:302023-12-02T19:37:59+5:30
तारकर्ली, मालवण, राजकोट, बोर्डिंग मैदान, सागरी महामार्गावर झाली रंगीत तालीम
मालवण : पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर शनिवारी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच दोन आणि तीन डिसेंबर रोजी रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याची कल्पना दिलेली असल्याने सर्वसामान्यांनीही त्याला प्रतिसाद दिला. सागरी महामार्ग, कोळंब पूल, बोर्डिंग मैदान, फोवकांडा पिंपळ, राजकोट, भरड, एसटीस्टॅण्ड, वायरी, तारकर्ली या मार्गावर दुपारी चार ते सहा या वेळात पोलिसांनी गाड्यांचा ताफा नेऊन रंगीत तालीम घेतली. यावेळी रस्त्याच्या बाजूने नागरिकांनी उभे राहून पोलिसांच्या रंगीत तालीमचा आनंद घेतला.
४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात आणि तारकर्ली मार्गावर सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांचा ताफा फिरवून तपासणी करण्यात आली. या ताफ्यामध्ये सर्व सुरक्षा यंत्राणांचे अधिकारी तसेच इतरही पथके सहभागी झाली होती.
अन् ताफा रवाना झाला
पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर बोर्डिंग मैदानावर उतरले अन् त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट राजकोट किल्ला येथे रवाना झाले. त्यानंतर पुन्हा ताफा माघारी फिरून सागरी महामार्गावरून तारकर्लीच्या दिशेने रवाना झाला. अशाप्रकारे शनिवारी दुपारी रंगीत तालीम घेण्यात आली. यात पन्नास ते साठ गाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. अशाचप्रकारे रविवारी दुपारी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. यामुळे कोळंब मालवण, देऊळवाडा मालवण, मालवण तारकर्ली हे प्रमुख तिन्ही मार्ग बंद करून ठेवण्यात आले होते. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करत गाड्या थांबून वाहनांचा ताफा जाणारा मार्ग खुला करून ठेवला होता. पोलिसांनीही सर्व वाहनचालकांनी रविवारीही अशाचप्रकारे गाड्यांची वाहतूक थांबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनेक हात मदतीला सरसावले..
४ डिसेंबर रोजी मालवण मध्ये होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त संपूर्ण राज्यातून आणि राज्या बाहेरून या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिस खात्याची बरीच माणसे मालवणमध्ये आली आहेत. त्यांच्या जागा सारख्या बदलत असतात किंवा वस्तीला आहेत तिथून त्यांच्या कामगिरीची ठिकाणे लांब असतात. बाहेरचे असल्याने येथील परिसराचीही माहिती नसते व बरेच जण चालत फिरताना दिसतात. आपणाला असे चालताना त्यांच्यापैकी कोणी दिसले तर त्यांना त्यांच्या ड्यूटीवर शक्यतो पोहोचवा, असे आवाहन केले जात आहे.
समुद्रमार्गे रस्ता होणे आवश्यक....
सध्या नेव्ही कार्यक्रमासाठी सर्वच स्तरातून नियोजन चालले आहे. तसेच लोकांची प्रात्यक्षिके बघण्यासाठी जी गर्दी होते, त्यांचे नियोजन आणि काही तालुक्यातून शाळकरी मुले मोठ्या गाड्या घेऊन तारकर्ली पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तारकर्लीतील प्रमुख अडथळा उद्भवणारे अरुंद रस्ते हा मोठा प्रश्न आहे. शिवाय प्रशासनाच्या विविध डिपार्टमेंटची लोकं सतत ये-जा करीत आहेत, गाड्या वळवण्यासाठी पण मोठी कसरत करावी लागत आहे. यासाठी समुद्र किनाऱ्यावर रस्ता होण्याची आवश्यकता आहे.