आंबोली धबधब्यावरील दगड कोसळले, पर्यटक किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:50 AM2023-06-30T11:50:19+5:302023-06-30T11:50:51+5:30
असुरक्षितता आली समोर
आंबोली (सिंधुदुर्ग) : ईदनिमित्त सुटी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीमध्ये दाखल झाले होते. दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने वर अडकून पडलेले सुमारे एक ते दीड फूट रुंदीचे दोन-तीन दगड धबधब्यातून खाली कोसळले. यातील एक दगड बेळगाव येथील पर्यटकाला लागल्याने तो किरकोळ जखमी झाला.
गेले दोन दिवस आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात गुरुवारी ईद आणि आषाढी एकादशीची सुटी असल्याने बरेचसे पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आंबोलीत दाखल झाले होते. अजूनही म्हणावा तशा प्रमाणात धबधबा कोसळत नाही. तो काही अंशी प्रवाहित झाला आहे. त्यावर अंघोळ करण्याचा आनंद काहीजण घेत होते.
असुरक्षितता आली समोर
सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक धबधब्याच्या वरून हे दगड कोसळलेले बघून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पर्यटकांमध्ये धावपळ झाली. सुदैवाने मोठी हानी झाली नाही. धबधबा सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.