रॉकस्टारच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध, सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचा चौथा दिवस : हास्यसम्राटांच्या कॉमेडीने खळखळून हसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:01 PM2018-01-01T19:01:10+5:302018-01-01T19:06:00+5:30
मोती तलावाचे अप्रतिम सौंदर्य व बोचणाऱ्या गुलाबी थंडीच्या साथीने सारेगम विजेता रॉकस्टार जसराज जोशी यांनी सादर केलेली अंगावर शहारे आणणारी गाणी, हास्यसम्राट के . अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांची सर्वांना खळखळून हसवायला लावणारी धमाल कॉमेडी आणि नृत्याविष्काराने सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी रात्री चांगलीच रंगत भरली. शेवटपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.
सावंतवाडी : मोती तलावाचे अप्रतिम सौंदर्य व बोचणाऱ्या गुलाबी थंडीच्या साथीने सारेगम विजेता रॉकस्टार जसराज जोशी यांनी सादर केलेली अंगावर शहारे आणणारी गाणी, हास्यसम्राट के . अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांची सर्वांना खळखळून हसवायला लावणारी धमाल कॉमेडी आणि नृत्याविष्काराने सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी रात्री चांगलीच रंगत भरली. शेवटपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.
सावंतवाडी पर्यटन महोत्सवात शनिवारी चौथ्या दिवशी मुंबई येथील आदिस क्रिएशन प्रस्तुत रंगारंग हा हिंदी-मराठी गाण्यांचा व कॉमेडीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवराम राजे यांच्या पुतळ््याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात गोवा आयडॉल अक्षय नाईक यांनी कटार काळजात घुसली या चित्रपटातील मन मंदिरा तेजाने उजळून येई सागरा... या मराठी गाण्याने केली. त्यानंतर कोकणची महागायिका विजेती नेहा आजगावकरने तेरे लिये दुनिया छोड दी है, पान खाये सय्या हमारो...ही दमदार गाणी सादर केली. त्याला सावंतवाडीकरांनी टाळ््यांची दाद दिली. मंचावर आलेल्या व्हाईस आॅफ इंडिया फेम रचित अग्रवालने हार्मोनियमवर मेरे मौला मेरे मौला... ही कव्वाली सादर करीत सर्वांची मने जिंकली.
नमस्ते लंडनमधील मै जहा रहूँ मै कही भी रहूँ... हे गाणे सादर केले. बेधडक गाण्यांनी कार्यक्रमात रंगत चढली असतानाच रॉकस्टार जसराज जोशी याचे आगमन झाले. त्याने वंदे मातरम्...हे देशभक्तीपर गाणे गात आपल्या सुरेल आवाजाचे सादरीकरण केले. त्याच्या तेरी दिवानी..., दिल से रे... या गाण्यांवर लोकांनी ठेका धरत वन्समोअरची मागणी केली. त्यानंतर आजा आजा दिल्ली... आणि बत्तमीज ये दिल माने ना... या गाण्यांवर बच्चे कंपनीने धमाल केली.
नेहा आजगावकर आणि अक्षयने सैराटमधील सैराट झालं जी..., अक्षयने घेई छंद मकरंद... हे शास्त्रीय गीत सादर करीत कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. रचित अग्रवालने परदा है परदा..., तू माने या ना माने..., साजन मोरे घर आ जाना... आदी गाणी सादर केली. यानंतर आलेल्या हास्य सम्राट के.अजेश, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांच्या कॉमेडीने सर्वांना हसविले.